पुण्यातील प्रसिद्ध पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख गौतम पाषाणकर अखेर सापडले आहेत. तब्बल एक महिन्यानंतर त्यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. २१ ऑक्टोबरला गौतम पाषाणकर अचानक बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर तपास सुरू असताना गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट समोर आली होती. सुसाईड नोटमध्ये त्यांनी व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. यानंतर शहरातील उद्योजक क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती.

पुणे- गौतम पाषाणकरांनी बेपत्ता होण्याआधी ATM मधून काढले ५००० रुपये, फोनमधील सर्व माहिती डिलीट

जयपूर येथे गौतम पाषणाकर सापडले आहेत. गौतम पाषाणकर बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबाने तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून युनिट १ या प्रकरणाचा तपास करत होते. पोलीस निरीक्षक ताकवले यांना गौतम पाषाणकर राज्याबाहेर गेले असावेत अशी माहिती त्यांच्या सूत्रांकडून मिळाली होती. त्यादृष्टीने तपास सुरु होता. मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जयपूर येथील एका हॉटेलमध्ये गौतम पाषाणकर असल्याची माहित युनिट १ क्राइम ब्रांचला मिळाली. सध्या त्यांना पुण्यात परत आणण्याची प्रक्रिया सुरु आहे.

नेमकं काय झालं होतं –
गौतम पाषाणकर २१ ऑक्टोबरला बेपत्ता झाले होते. तपास सुरू असताना चालकाकडे दिलेल्या लिफाफ्यात सुसाईट नोट असल्याचं आढळून आलं. मागील काही दिवसापासुन व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं त्यांनी त्यात लिहिलं होतं.

“गौतम पाषाणकर हे बुधवारी नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर पडले होते. पाषाणकर हे लोणी काळभोर येथील गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये गेले. तेथून ते शिवाजीनगर येथील ऑफिसमध्ये आल्यावर एक बंद लिफाफा चालकाकडे दिला आणि हे घरी देण्यास सांगितले. चालक लिफाफा देण्यासाठी घरी गेला. त्यानंतर पाषाणकर ऑफिस मधून बाहेर पडले आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिशेने चालत निघून गेले. गौतम पाषाणकर घरी न आल्याने कुटुंबीयांनी अखेर पोलीस स्थानकात धाव घेतली,” अशी माहिती पोलिसांनी दिली होती.

“…म्हणून आत्महत्या करतोय,” पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम पाषणकरांची सुसाईड नोट सापडल्याने खळबळ

गौतम पाषाणकर यांचं शेवटचं लोकेशन शहरातच दाखवत होतं. याशिवाय एटीएममधून पाच हजार रुपये काढल्याचंही समोर आलं होतं. तसंच त्यांनी फोन फॉरमॅट करत सर्व माहिती डिलीट केली असल्याची माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली होती.

पोलिसांनी गौतम पाषाणकर यांचा एक फोटो प्रसिद्ध केला होता ज्यामध्ये ते शेवटचे दिसले होते. शिवाजीनगर पोलिसांनी जर कोणी त्यांना पाहिलं असल्यास किंवा इतर काही माहिती असेल तर आपल्याकडे येण्याचं आवाहन केलं होतं. पोलिसांनी याप्रकरणी चालकाचीही चौकशी केली होती.