पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सेवा सुरू

पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी ट्विटवर येण्याची सूचना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस आयुक्तालयात पार पडलेल्या गुन्हे आढावा बैठकीत केली. नागरिकांनी ट्विटरवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या शंकाचे निरसन करावे तसेच समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशाही सूचना पोलीस आयुक्तांनी केल्या.

पुणे शहरातील गुन्ह्य़ांचा आढावा घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. पोलीस आयुक्त शुक्ला, सहआयुक्त सुनील रामानंद यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. गेल्या महिन्यात शहरात वाढलेल्या घरफोडय़ांच्या गुन्ह्य़ांच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा करण्यात आली तसेच गुन्ह्य़ांचा छडा लावण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यात आली. रमजान महिना आणि शहरात होणाऱ्या पालख्यांच्या आगमनासाठी पोलिसांकडून आखण्यात आलेल्या बंदोबस्ताचा आढावा घेण्यात आला.

गेल्या आठवडय़ात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुणे पोलिसांच्या ट्विटर खात्याचा प्रारंभ करण्यात आला. पोलीस ठाण्यांचे कामकाज सांभाळणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी ट्विटर खाते सुरू करावे. त्या माध्यमांतून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या.