आळंदी येथून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि देहू मधुन जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. उद्या (बुधवार) पुणे शहरात दुपारच्या सुमारास दोन्ही पालख्यांचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणेकर नागरिकांना पालखीची प्रत्येक माहिती त्वरित मिळावी यासाठी ‘चेंज भाई’ हे वेब पेज तयार करण्यात आल्याची माहिती वाहतुक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली.

यावेळी अधिक माहिती देताना पंकज देशमुख म्हणाले की, आळंदी येथुन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि देहू मधुन जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या आगमानाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आणि वाहतुक पोलिस सज्ज झाले आहेत. त्यानुसार शहरातील अंतर्गत वाहतुक वळविण्यात आली आहे. तर पालखीतील वाहनं आणि नागरिकांच्या वाहनांसाठी आरटीओ कार्यालया शेजारील एसएसपीएमएस मैदान, रेसकोर्स आणि सिंचननगर जवळील मैदानावर वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

याशिवाय शहरात दोन्ही पालख्या आल्यापासून ते त्या शहरातून बाहेर पडेपर्यंत सर्व माहिती मिळावी यासाठी चेंज भाई हे वेब पेज तयार केले गेले आहे. या माध्यमातुन पुणेकरांना पालखी मार्गाची प्रत्येक अपडेट मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.