05 March 2021

News Flash

पुढच्या वर्षी पाऊस पडला नाही तरी पाणी पुरेल असे नियोजन – गिरीश बापट

पुण्याचे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळविल्याने त्या भागातील नागरिकांनाही पुणेकर किती दानशूर आहेत हे कळले.

पालकमंत्री गिरीश बापट

 

पालकमंत्री गिरीश बापट यांचा दावा

पुणेकरांचे पाणी दौंड, इंदापूरला वळविल्याने ओरड चालू आहे. परंतु पुणेकरांना पाण्याची टंचाई न जाणवता देखील पुढील एक महिना पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे. यंदा पाऊस पडेल, यात शंका नाही. परंतु सध्याचे पाणी संकट पाहता पुढील वर्षी पाऊस पडला नाही, तरी पुणेकरांना पाणी पुरेल अशा प्रकारे आम्ही पाण्याचे नियोजन करत आहोत, असा दावा पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी केला.

विश्रामबाग मित्र मंडळ ट्रस्टतर्फे अमरावतीतील दुष्काळग्रस्त भागातील शंभर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना वर्षभर धान्य पुरविण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात बापट यांच्या हस्ते करण्यात आली, या वेळी ते बोलत होते.

संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत आहे. नागरिकांना आणि जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. पुण्याचे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळविल्याने त्या भागातील नागरिकांनाही पुणेकर किती दानशूर आहेत हे कळले. त्यामुळे आपल्यामध्ये प्रेम आणि आपुलकी वाढेल. दुष्काळग्रस्त भागात पाणी पाठविल्यामुळे अडीच लाख जनावरांना आणि साडेतीन लाख लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. आपल्याकडे पाणी शिल्लक असताना देखील दुष्काळाने होरपळणाऱ्या भागात पाणी न देणे योग्य नाही, असे बापट यांनी या वेळी सांगितले. पुढच्या वर्षी पाऊस पडला नाही तरी पाणी पुरेल, असे नियोजन करत आहोत, असेही ते म्हणाले.

उपक्रमाची माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष नितीन कोतवाल म्हणाले,की अमरावतीतील चांदूरबाजार, वरुड, अंजनगाव, तिवसा, मोर्शी, दर्यापूर, भातुकली, अचलपूर जिल्ह्य़ांमधील कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्यात येणार आहे. त्यासाठी या कुटुंबांचे वर्षभरासाठीचे पालकत्व आमच्या गणेशोत्सव मंडळाकडून घेण्यात आले आहे. आपल्याला धान्य पुरविणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे अशावेळी त्यांना मदत करणे, हे आपले कर्तव्य आहे यासाठी हा उपक्रम केला जात आहे. जगन्नाथ लडकत यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष संतोष जगताप, कार्याध्यक्ष रवींद्र जाधव, राजेश मांढरे, संजय जगताप, राहुल जाधव, अविनाश जगताप, धनंजय जगताप, उमेश जगदाळे आदींची या वेळी उपस्थिती होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 4:12 am

Web Title: girish bapat commented on water shortage
टॅग : Girish Bapat
Next Stories
1 पायाने उत्तरपत्रिका.. अन् प्रथम श्रेणी
2 बारावीचा निकाल घसरला
3 भीमाशंकरमध्ये पाच ठिकाणी बिबटय़ाच्या खुणा!
Just Now!
X