नागरिकांच्या तक्रारींसाठीच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ क्रमांकावर चुकीचे संदेश

नागरिकांना आपल्या तक्रारी दाखल करणे अधिक सोयीचे व्हावे, यासाठी पिंपरी महापालिकेने ‘व्हॉट्सअ‍ॅप’ क्रमांक उपलब्ध करून देत चांगली सुविधा दिली. त्याचा अपेक्षित उपयोग होतो की नाही, हे पुरते स्पष्ट झाले नाही. मात्र, त्या क्रमांकावर ‘सुप्रभात’, ‘शुभरात्री’च्या संदेशांचा मारा सुरू असून ‘कट-पेस्ट’ आणि नको ते संदेश आहे तसेच पुढे पाठवण्याच्या सपाटय़ामुळे ही यंत्रणा सांभाळणारे अधिकारी-कर्मचारी पुरते वैतागून गेल्याचे दिसून येते.

पिंपरी पालिकेने हद्दीतील नागरिकांना त्यांच्या समस्यांविषयी तक्रार दाखल करण्यासाठी विविध माध्यमे उपलब्ध करून दिली आहेत. वेबपोर्टल, एसएमएस, ई मेल, मोबाइल अ‍ॅप, सारथी हेल्पलाइन आदी माध्यमांतून तक्रारी स्वीकारल्या जातात. अशाच प्रकारे नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेने ‘९९२२५०१४५०’ या मोबाई क्रमांकाद्वारे ‘व्हॉट्सअ‍ॅप’ची सुविधा उपलब्ध करून दिली. नागरिकांना आपल्याला दिसून येणारी समस्या याद्वारे मांडता येणार होती. कचरा, सांडपाणी, अतिक्रमण, खड्डे, पाण्याविषयीच्या तक्रारींसाठी ही सुविधा अतिशय उपयुक्त होती. प्रथम तक्रार करतेवेळी नागरिकांना आपले नाव व पत्ता नोंदवावा लागत होता. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित नागरिकास टोकन क्रमांक दिला जात होता आणि काम झाल्यानंतर एसएमएसद्वारे संबंधित नागरिकास कळवण्यात येत होते.

१५ ऑगस्ट २०१८ पर्यंत म्हणजे गेल्या ११ महिन्यांत २७२७ नागरिकांनी विविध प्रश्न मांडले. दर महिन्याला तक्रारींचा पाऊस पडू लागला. काही प्रश्न सुटत होते काही प्रश्नांना वाचा फुटत होती. तर, अनेक प्रश्न ‘जैसे थे’ राहत होते.

एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे वेगळेच चित्र दिसून येत होते. समस्या मांडण्याऐवजी अनेकांकडून ‘सुप्रभात’, ‘शुभरात्री’च्या संदेशांचा मारा होत होता. हे कमी म्हणून की काय, शेरोशायरी, शिक्षकांवरचे तसेच नवरा-बायकोवरील विनोद, बौद्धिक आणि उपदेश देणारे संदेश इथपासून ते अकरा जणांना हा संदेश पाठवा धनलाभ होईल, असे भलतेच संदेश या क्रमांकावर सातत्याने येऊ लागले. त्यामुळे हा विभाग सांभाळणारी यंत्रणा पुरती बेजार झाली. ज्या हेतूने ही सुविधा देण्यात आली आहे, त्यासाठीच नागरिकांनी वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.