News Flash

आत्महत्येपासून परावृत्त करणारी हेल्पलाईन

नैसर्गिकरीत्या मृत्यू आला तर त्याचे वाईट वाटते. पण, एखाद्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवले तर त्याचे अधिक वाईट वाटते. एकाकीपणा आणि त्यातून येणारे नैराश्य ही

| September 6, 2014 02:30 am

नैसर्गिकरीत्या मृत्यू आला तर त्याचे वाईट वाटते. पण, एखाद्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवले तर त्याचे अधिक वाईट वाटते. एकाकीपणा आणि त्यातून येणारे नैराश्य ही आत्महत्येची प्रमुख कारणे असून अशा लोकांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करणाऱ्या ‘कनेक्टिंग एनजीओ’ या हेल्पलाईनला सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.
दरवर्षी जगभरात सुमारे दहा लाख लोक आत्महत्येमुळे दगावतात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या २०१३ च्या अहवालानुसार भारतामध्ये १ लाख ३४ हजार ८०० जणांनी आत्महत्येद्वारे आपले जीवन संपविले. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून गेल्या वर्षी १६ हजार ६२२ जणांनी आत्महत्या केली. १५ ते ४४ वर्षे वयोगटातील मृत्यूपैकी आत्महत्या हे तीन प्रमुख कारणांपैकी एक आहे. आत्महत्येचे प्रयत्न केलेले आणि आत्महत्येने मृत्यू पावलेले पण त्याची नोंद नसलेले अशी संख्या वेगळीच आहे, अशी माहिती ‘कनेक्टिंग एनजीओ’ संस्थेतर्फे शुक्रवारी देण्यात आली. १० सप्टेंबर हा आत्महत्या प्रतिबंध दिवस असून ‘आपण सर्व एकमेकांशी जोडलेले आहोत’ हा यंदाच्या वर्षीचा विषय आहे.
आत्महत्येने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे मानसिक दु:ख हे कल्पनेपलीकडचे असते. मानसिक आजार, उदासिनता आणि व्यसनाधीनता हे आत्महत्येचे मोठे कारण आहे. जी व्यक्ती आत्महत्येच्या विचाराने ग्रस्त आहे तिला एखाद्या व्यक्तीसोबत असणे गरजेचे असते. एकाकीपण हे आत्महत्येसाठीचे कारण असू शकते. हे ध्यानात घेऊन आपसातील घट्ट नाते आत्महत्येचा विचार रोखू शकते. जे लोक इतरांपासून अलिप्त आहेत, आत्महत्येच्या विचाराने ग्रासलेले आहेत अशांपर्यंत पोहोचून त्यांना मानसिक आणि भावनिक आधार देत त्यांच्याशी मैत्रीचे नाते प्रस्थापित करण्याचे काम करणे हेच ‘कनेक्टिंग एनजीओ’चे उद्दिष्ट आहे.
तणाव आणि नैराश्यातून आत्महत्येचा विचार आलेली व्यक्ती आमच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधते. आमच्या स्वयंसेवकांशी बोलल्यानंतर त्यांचे मन मोकळे होते. भावनेचा कोंडमारा संपतो. अशा व्यक्ती आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त होतात आणि त्यांच्यामध्ये सकारात्मकतेचा अंकुर रुजतो, अशी माहिती या हेल्पलाईनसाठी स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या प्रज्ञा पिसोळकर यांनी दिली. एकाकीपण असलेल्या व्यक्तीने ……१८००२०९४३५३…. किंवा ९९२२००११२२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आत्महत्येचा विचार करणारी व्यक्ती कशी ओळखावी
– आत्महत्येचा विचार आणि चर्चा
– नैराश्य आणि हतबलतेची भावना
– मन:स्थितीमध्ये वारंवार बदल आणि चिडचिड
– संताप आणि एकाकीपणाची भावना
– आत्महत्येचे नियोजन
– नातलगांशी निरोपाचे भाषण
– किमती वस्तूंचे वाटप
– वर्तणुकीमध्ये अचानक बदल
– अमली पदार्थाचे सेवन
मदतीचा हात
– मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशकांचा सल्ला घेणे
– स्वत:चे मत न लादता सह अनुभूतीपूर्वक आणि लक्षपूर्वक म्हणणे ऐकून घेणे
– आत्महत्येच्या विचाराने ग्रस्त असलेल्या लोकांना उपदेश न करता त्यांची मदत करणे
– आत्महत्येच्या विचारात असलेल्या व्यक्तीला एकटे सोडू नये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 2:30 am

Web Title: helpline for free from suicide
Next Stories
1 आघाडीतील जागावाटपाबाबत दिल्लीत आज सर्वोच्च नेत्यांची बैठक
2 राजकीय श्रेयासाठी औंध-रावेत उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाची घाई
3 कबीर कला मंचच्या अटकेतील सदस्यांसोबत अरुण भेलके याचे फोटो एटीएसला मिळाले
Just Now!
X