अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

संभाव्य दहशतवादी हल्लय़ांचा पाश्र्वभूमीवर शहरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. गणेशोत्सवात अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी संशयित व्यक्ती, बेवारस वस्तू आणि बेवारस वाहन आढळल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्षात (दूरध्वनी-१००) संपर्क साधावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

घातपाती कारवायांसाठी मोटारीचा वापर होऊ शकतो, अशा सूचना गुप्तचर यंत्रणांनी पुणे पोलिसांना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने रस्त्याच्या कडेला असलेली बेवारस वाहने, संशयित व्यक्ती तसेच बेवारस वस्तू आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. जुनी वाहने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून पोलिसांनी माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे तसेच सदनिका भाडेतत्त्वावर देताना भाडेकरूंची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले आहे.

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी लावण्यात आलेल्या बंदोबस्तात वाढ केली आहे. शहरातील हॉटेल, लॉजची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. शहरात बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनचालकांची चौकशी करण्यात येत आहे. संशयितांवर पोलिसांनी लक्ष ठेवले आहे.

साध्या वेशातील पोलिसांचा मध्यभागात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बेवारस वस्तूंना हात लावू नये. तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी करताना संभाव्य घातपाती कारवायांचा विचार केला आहे. नागरिकांनी कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. समाजमाध्यमांतून मोठय़ा प्रमाणावर अफवा पसरविल्या जाण्याची शक्यता आहे. संशयित व्यक्ती, बेवारस वाहने आणि वस्तूंची तातडीने पोलिसांना माहिती द्यावी.

– गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा