पहिल्या टप्प्यात एक हजार ८० परवडणारी घरे

राज्य शासनाच्या गृहप्रकल्प कायद्यान्वये गृहप्रकल्पांमधील काही घरे अत्यल्प, अल्प व मध्यम, उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी बांधण्यात येतात. त्यानुसार सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटीमध्ये पहिल्या टप्प्यात एक हजार ऐंशी घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही घरे म्हाडामार्फत सोडतीद्वारे नागरिकांना परवडणाऱ्या दरांत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सोडतीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या घरांचे जोते (प्लिंथ) तयार असून दीड वर्षांत या घरांची बांधणी पूर्ण होणार आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने पुणे विभागातील विविध ठिकाणच्या ३ हजार १३९ सदनिका व २९ भूखंडांच्या विक्रीसाठीची सोडत ३० जून रोजी संगणकाद्वारे काढण्यात येणार आहे. सोडतीद्वारे काढण्यात येणाऱ्या या ३ हजार १३९ सदनिकांमधील १ हजार ८० सदनिका नांदेड सिटीमधील आहेत, ज्यामध्ये तीनशे बावीस चौरसफूट ते चारशे तीस चौरसफुटांच्या सदनिकांचा समावेश आहे. सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटीमधील आयटी इनक्युबेशन सेंटरमध्ये ३० जून रोजी सकाळी दहा वाजता ही सोडत काढण्यात येणार आहे. खासगी विकसकामार्फत एवढय़ा मोठय़ा संख्येने अल्प व मध्यम गटातील नागरिकांना जनरंजनी नामक गृहप्रकल्पांच्या माध्यमातून परवडणारी घरे उपलब्ध करून देणारी नांदेड सिटी ही राज्यातील पहिलीच बांधकाम संस्था ठरली आहे, अशी माहिती नांदेड सिटीकडून देण्यात आली.

सोडतीचे वेळापत्रक

ऑनलाइन अर्ज नोंदणीची सुरवात १९ मे दुपारी १२ वाजता, सोडतीसाठी ऑनलाइन अर्जाची सुरवात २० मे दुपारी दोन वाजता, ऑनलाइन अर्ज नोंदणीची अखेरची तारीख १८ जून, सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अखेरची तारीख १९ जून, क्रेडिट व डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन पैसे २० जूनपर्यंत स्वीकारणार, आरटीजीएस, एनइएफटीद्वारे किंवा नेटबँकिंगद्वारे अनामत रक्कम २० जूनपर्यंत भरता येणार, सोडतीसाठी स्वीकारलेल्या अर्जाची प्रारूप यादी २४ जून तर अंतिम यादी २६ जूनला प्रसिद्ध होईल. सोडत ३० जून रोजी नांदेड सिटी येथील आयटी इनक्युबेशन सेंटर येथे निघणार असून सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची यादी ३० जून रोजी  संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.