03 March 2021

News Flash

शिवसेनेतील मरगळ कशी दूर होणार?

मनसेची सदस्यसंख्या आठवरून अठ्ठावीसवर गेली आहे आणि पक्षाचे कामही कोणत्या ना कोणत्या स्वरुपात पुणेकरांना दिसत आहे. त्यामुळे सेनेची रेघ मोठी करण्यासाठीचा कार्यक्रम शहर शिवसेनेला हाती

| September 11, 2013 02:41 am

भाजपा आणि मनसेपेक्षाही शिवसेनेची रेघ मोठी होणार, शिवसेनेतील मरगळ दूर करणार, पुणे शहर जिल्ह्य़ात विधानसभेच्या पंधरा जागांवर युतीला विजय मिळणार, अशा घोषणा सेनेचे नवे संपर्कप्रमुख गजानन कीर्तिकर यांनी केल्या असल्या, तरी या आणि अशा कितीतरी गोष्टी प्रत्यक्षात कशा येणार याबाबत मात्र प्रश्नचिन्हच आहे.
पुणे शहर व जिल्याच्या संपर्कप्रमुखपदी कीर्तिकर यांची नियुक्ती नुकतीच झाली असून त्यांनी पुण्यातील शिवसेना भवनात जी पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक घेतली त्या बैठकीत आणि पत्रकार परिषदेत विविध घोषणा केल्या. पक्षात आलेली मरगळ दूर करणार ही त्यातील मुख्य घोषणा होती. यापुढे पक्षाचे काम कार्यालयात बसून नाही, तर रस्त्यावर उतरून केले जाईल असेही त्यांनी जाहीर केले. मनसेचे आव्हान पुण्यात असताना शिवसेना कशा पद्धतीने काम करणार आहे, या प्रश्नावर ‘शिवसेनेची रेघ आता मनसेच काय; भाजपापेक्षा मोठी होणार आहे,’ असाही दावा त्यांनी केला.
संपर्कप्रमुखपद स्वीकारल्यानंतर कीर्तिकर यांनी अशा विविध घोषणा केल्या असल्या, तरी त्या प्रत्यक्षात कशा येणार आहेत याबाबत प्रश्नचिन्ह आहे. महापालिकेच्या गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेची सदस्यसंख्या वीसवरून पंधरावर आली आहे आणि सर्वात कमी सदस्यसंख्या असल्यामुळे शिवसेनेला महापालिकेतील समित्यांमध्येही नाममात्र स्थान मिळाले आहे. पक्षाला गेले दोन वर्षे शहर प्रमुख नाही. त्यामुळे संघटनेच्या जोरावर पक्ष चालण्याऐवजी पक्षाचा संपूर्ण कार्यक्रम महापालिकेतील वादाच्या विषयावर आधारित असाच राहिला आहे. त्यातही पुण्याशी संबंधित अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांवर शिवसेनेने वेळोवेळी भूमिका बदलल्याचेही पुणेकरांनी बघितले आहे. अशा प्रकारांना कीर्तिकर कसा आळा घाळणार आणि त्याबाबत ते नक्की कोणती भूमिका घेणार, हा मुख्य प्रश्न आहे.
गेल्या काही वर्षांत रमेश बोडके, रामभाऊ पारीख, नाना वाडेकर अशा काही शहरप्रमुखांनी संघटनेच्या बांधणीला जे महत्त्व दिले होते, तशी बांधणी करणारे प्रमुख कीर्तिकर यांच्या कार्यकाळात नेमले जाणार का, हाही आणखी एक प्रश्न आहे. पक्ष म्हणून शिवसेनेचे जे अस्तित्व शहरात पूर्वी जाणवत असे, तेही आता दिसत नाही. त्यामुळे पक्षातील मरगळ दूर करणार अशी करण्यात आली असली, तरी त्यासाठीचा कार्यक्रम काय आहे, हे अद्याप जाहीर झालेले नाही. मनसेपेक्षा शिवसेना मोठी होणार असेही विधान केले जात असले, तरी मनसेची सदस्यसंख्या आठवरून अठ्ठावीसवर गेली आहे आणि पक्षाचे कामही कोणत्या ना कोणत्या स्वरुपात पुणेकरांना दिसत आहे. त्यामुळे सेनेची रेघ मोठी करण्यासाठीचा कार्यक्रम शहर शिवसेनेला हाती घ्यावा लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2013 2:41 am

Web Title: how to remove apathy from pune shiv sena
Next Stories
1 पावणेचार लाखांचा ऐवज लंपास करणारी मोलकरीण गजाआड
2 बहि:स्थ पदव्युत्तरबाबत अजून अंतिम निर्णय नाही – कुलगुरूंचे स्पष्टीकरण
3 पिंपरी महापौरांचा विदेश दौरा – पाच लाखाच्या खर्चास मंजुरी
Just Now!
X