जनआंदोलनातून राजकारणामध्ये उतरू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रसार माध्यमांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या विधानांशी मी सहमत नाही, असे ‘आप’चे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुभाष वारे यांनी शनिवारी स्पष्ट केले.
प्रसार माध्यमांसंदर्भात केलेल्या विधानांबाबत खुद्द केजरीवाल यांनीच खुलासा केला आहे. त्यांची विधाने ही दोन-तीन वाहिन्यांपुरतीच मर्यादित होती असेही त्यांनी म्हटले असल्याचे वारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. वैयक्तिक आपला अनुभव तसा नाही. जनआंदोलनांच्या पाठीशी प्रसारमाध्यमे खंबीरपणे उभी राहिली आहेत. त्यामुळे काही प्रश्नांना वाचा फुटली असून काही प्रश्न धसास लागले आहेत. त्याचप्रमाणे जनआंदोलनातून राजकारणामध्ये उतरू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रसार माध्यमांचा चांगला पाठिंबा मिळतो. त्यामुळे केजरीवाल यांच्या मताशी मी सहमत नाही, असेही त्यांनी सांगितले.
मी पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे माझ्यासाठी जनतेकडूनच पैसा गोळा केला जात आहे. त्यामुळे नागपूरमध्ये झाला तसा कार्यक्रम पुण्यामध्ये होणार नाही. कार्यकर्त्यांच्या जोरावरच जनतेशी संपर्क साधण्यात येत आहे, असे सांगून वारे म्हणाले, एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ामध्ये केजरीवाल पुण्यामध्ये येणार असून मेधा पाटकर आणि योगेंद्र यादव यांच्या सभा होतील. खासदाराच्या कार्यकक्षेची स्पष्टता मांडणारी भूमिका लवकरच जनतेला सादर करणार आहे.
कलाकारांचा ‘आप’ला पाठिंबा
व्यवस्था परिवर्तन आणि स्वच्छ राजकारण या उद्दिष्टाच्या दिशेने अधिकाधिक प्रयत्न करणाऱ्या आम आदमी पक्षाला नाटक, चित्रपट आणि नृत्य क्षेत्रातील कलाकारांनी शनिवारी पाठिंबा जाहीर केला. काही पक्षांचा हुकूमशाहीकडे असलेला ओढा, सर्वव्यापी झालेली घराणेशाही, सामान्यांविषयी संवेदनाहीन असलेला अकार्यक्षम कारभार या पाश्र्वभूमीवर आपला हा पाठिंबा जाहीर करीत असल्याचे नाटककार मकरंद साठे यांनी सांगितले. केवळ पाठिंबा जाहीर करण्यापेक्षाही रॅली आणि पथनाटय़ या माध्यमातून उमेदवारांचा प्रचारही करणार असल्याचे किरण यज्ञोपवीत आणि मोहित टाकळकर यांनी सांगितले.