एकवेळेस मी राजकारण सोडेन, पण शिवसेना सोडणार नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी बुधवारी मांडली. मतदार संघामध्ये वैयक्तिक संपर्क ही माझी ताकद असून, तिथे शरद पवार यांच्या विरोधातही मी निवडणुकीत लढेन, असेही ते म्हणाले.
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या आयडिया एक्स्चेंज कार्यक्रमात आढळराव बोलत होते. आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची सातत्याचे चर्चा होते, या प्रश्नावर आढळराव यांनी त्यांची भूमिका मांडली. या केवळ वावडय़ा आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही.
प्रस्तावित विमानतळाच्या मुद्दय़ावर ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांपासून शरद पवार व अजित पवार यांच्यासह कुणालाही विमानतळाची नेमकी जागा माहीत नाही. कोणत्याही गोष्टीबाबत ही मंडळी स्पष्टीकरण करीत नाही. शासन याबाबत कोणाशीही चर्चा करीत नाही. चाकण भागामध्ये प्रस्तावित जागेत ६५ टक्के शेती आहे. विमानतळाला आमचा विरोध नाही, पण त्यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे. त्यामुळे तेथे विमानतळास हारकत घेतली आहे. विमानतळाच्या प्रश्नासाठी मी लढतो आहे, मात्र इतर नेते तेथे येऊन काहीतरी वक्तव्य करतात. नीलम गोऱ्हे यांनी शेतकऱ्यांना पॅकेज देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांना विश्वासत घेतले जात नाही, त्यामुळे पॅकेजचा प्रश्नच येत नाही.
निवडणुकीत पैशाच्या भरमसाठ वापराबाबत ते म्हणाले, निवडणुकीत पैशाचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतो. ही पद्धत बदलणे कठीण असले, तरी त्यात बदल झाला पाहिजे. कसे निवडून यायचे, हे राष्ट्रवादी व अजित पवार शिकवीत आहेत, आस टोलाही त्यांना लगावला.
‘रेड झोन’च्या प्रश्नावर ते म्हणाले, हा प्रश्न सोडविण्यासाठी काही वर्षे मी केंद्रामध्ये लढतो आहे. लष्कराच्या स्थानिक यंत्रणांकडून केंद्रात चुकीची माहिती पाठविली जाते. त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. मात्र, या पुढेही हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करत राहणार आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरची शिवसेना कशी आहे, या प्रश्नावर ते म्हणाले, बाळासाहेब असतानाही सुमारे १० ते १२ वर्षे उद्धव ठाकरे यांनी शिवसेना चालविली. त्यामुळे फारसा काही फरक पडलेला नाही. बाळासाहेब भाषणातून ऊर्जा देत होते. ती आता मिळत नाही इतकाच फरक पडला. राजकारणापेक्षा मतदारसंघाकडे लक्ष देण्याचे काम मी करतो, असेही ते म्हणाले.
‘जिल्ह्य़ातील खासदारांमध्ये समन्वय नाही’
केंद्रामध्ये जिल्ह्य़ातील एखादा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्ह्य़ातील खासदारांचा कोणताही समन्वय नाही, असेही शिवाजीराव आढळराव यांनी सांगितले. गजानन बाबर व मी एका विचाराने काम करतो. पण सर्वाचा समन्वय होत नाही. प्रत्येकाची धोरणे वेगळी असल्याने हा समन्वय होणे कठीण आहे, असेही त्यांनी सांगितले.