राज्यात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी प्रथमच माहिती संप्रेषण (आयसीटी) विषयाची परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, राज्य शासनाच्या आयसीटी योजनेअंतर्गत राज्यातील साधारण २० हजार शाळांपैकी फक्त तीन हजार शाळांमध्येच संगणक प्रयोगशाळा उभी करण्यात आली आहे.
केंद्र शासनाने इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (आयसीटी) योजना २००४ साली जाहीर केली. त्यानुसार राज्यातील शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा उभारणे आणि अभ्यासक्रमामध्ये आयसीटी विषयाचा समावेश करून संगणक साक्षरता वाढवणे हा उद्देश होता. केंद्राच्या योजनेनुसार राज्यात गेल्या वर्षीपासून माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रमामध्ये आयसीटीचा समावेश करण्यात आला आहे. मार्च २०१४ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेमध्ये आयसीटीचीही परीक्षा घेण्यात येणार आहे. एकूण पन्नास गुणांच्या या परीक्षेमध्ये ४० गुणांची लेखी परीक्षा आणि १० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, अभ्यासक्रम अस्तित्वात येऊन, त्याची परीक्षा घेण्याची वेळ आली, तरीही आयसीटी योजनेमध्ये राज्यातील फक्त तीन हजार शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा उभ्या राहिल्या आहेत. आयसीटीचा तिसरा टप्पा सध्या सुरू झाला असून या टप्प्यामध्ये पाच हजार शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. न्युपाच्या अहवालानुसारही राज्यातील ३५ टक्के माध्यमिक शाळांमध्ये अजूनही संगणक उपलब्ध नाहीत.
 आयसीटी योजनेमध्ये देशभरातील शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा उभारण्यासाठी केंद्र शासनाकडून निधी देण्यात येतो. या योजनेनुसार राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये संगणक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ५०० संगणक प्रयोगशाळा आणि दुसऱ्या टप्प्यात २ हजार ५०० संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या. शासनाकडून राबवण्यात येणारी आयसीटी योजना रेंगाळल्यामुळे आमदार किंवा खासदार निधीमधून अनेक शाळांमध्ये संगणक मिळाले असल्यामुळे आयसीटी योजनेमधून शाळांना संगणक मिळाले नाहीत, तरीही परीक्षा घेण्यात अडचण येणार नाही असे शिक्षण विभागेच म्हणणे आहे, तर परीक्षा घेणे एवढीच आमची जबाबदारी आहे, असे बोर्डाचे म्हणणे आहे. मात्र, शाळेत संगणक प्रयोगशाळा नसताना वर्षभर विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञान विषयाचे शिक्षण नेमके घेतले कसे याबाबत मात्र कुणीच बोलत नाही.