‘‘ग्रामपंचायतींपासून लोकसभांपर्यंत सातत्याने चालणाऱ्या निवडणुकांमुळे विकास कामात अडथळे येतात. निवडणूक व्यवस्थेवर संशोधन करून देशातील निवडणुका एका वेळी घेता येतील का, हे पहायला हवे,’’ असे मत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी व्यक्त केले.
माईर्स एमआयटीने आयोजित केलेल्या पाचव्या भारतीय छात्र संसदेच्या समारोप समारंभात फडणवीस बोलत होते. या वेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, तिबेटचे पंतप्रधान लोबसांग सांगे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, उद्योजक डॉ. अभय फिरोदिया, माजी पोलिस महासंचालक शैलजाकांत मिश्रा, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. राहुल कराड, डॉ. मंगेश कराड आदी उपस्थित होते. चौहान यांना या वेळी ‘आदर्श मुख्यमंत्री’ पुरस्कार देण्यात आला.
या वेळी चौहान म्हणाले,‘‘ग्रामपंचायतींपासून लोकसभांपर्यंत सातत्याने चालणाऱ्या निवडणुकांमुळे विकास कामात अडथळे येतात. निवडणूक व्यवस्थेवर संशोधन करून देशातील निवडणुका एका वेळी घेता येतील का, हे पहायला हवे. पोटनिवडणुका टाळता यायला हव्यात. त्याचप्रमाणे निवडणुकांमध्ये होणारा पैशाचा खेळ थांबवण्यासाठी राज्याकडून निधी मिळायला हवा. निवडणूक प्रक्रियेत सुधारणा केल्या तर खूप पैसा आणि वेळ वाचेल.’’
या वेळी फडणवीस म्हणाले,‘‘व्यवस्थेतील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. त्याचाच एक भाग म्हणून आठ अधिकाऱ्यांवर कारवाई करून २०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. येत्या काळात उद्योगांनाही प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगारही उपलब्ध होईल. शिक्षण व्यवस्थेतही बदल करण्याची आवश्यकता असून कौशल्य विकास होईल, असे शिक्षण युवकांना मिळायला हवे, तरच ते देशाच्या विकासाची धुरा सांभाळू शकतील. राज्यातील पाच हजार गावांना दुष्काळमुक्त करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना वीज आणि पाणी देण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ योजना तयार करण्यात येत असून परिवर्तनाची सुरूवात झाली आहे. ’’
छात्र संसदेच्या सातव्या सत्रात ‘जाती : लोकशाहीला तारक की मारक?’ या विषयावर डॉ. प्रकाश आंबेडकर, मुस्लीम समाजसुधारक मौलाना रिझवी, महाराष्ट्र विधानसेभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आपले विचार मांडले. या वेळी डॉ. आंबेडकर म्हणाले, ‘‘जातीचा वापर हा व्होट बँक म्हणून केला जातो. जातीच्या आधारे प्रतिनिधित्व होत असल्यामुळे अनेकदा योग्य व्यक्तींना संधी मिळत नाही. जातीच्या राजकारणाच्या परिणामांकडे आपण पाहात नाही. जाती आणि धर्माच्या राजकारणाला पर्याय शोधावा लागेल. हा पर्याय लोकशाहीची मूल्ये जपणारा असला पाहिजे.’’
छात्र संसदेच्या सहाव्या सत्रात ‘धर्म वादळात की वादळ धर्मात?’ या विषयावर स्वामी परिपूर्णानंद सरस्वती, डॉ. मोहन पॉल सिंग इशार, फादर डॉ. जोसेफ चिन्नयान, मैलाना महमद मदानी, नबाम रबिया आदींनी आपले विचार व्यक्त केले.