पुणे शहराला २५ जानेवारीपर्यंत १३५० एमएलडी पाणी पुरवठा करण्याचे ठरले असून त्यत्पूर्वी मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन पाणी प्रश्न मार्गी लागला जाईल. तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता जर पुण्याचा पाणी पुरवठा विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला. तर पाटबंधारे खात्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार करण्यात येईल, असा इशारा महापौर मुक्ता टिळक यांनी दिला आहे. काल पुणे शहराचे पाणी तोडल्यामुळे आज तातडीने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. त्या दरम्यान त्यांनी हा इशारा दिला.
जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमानुसार पुणे शहराला ८९२ एमएलडी पाणी मिळणे गरजेचे आहे. मात्र, तरी देखील अधिकच पाणी घेत असल्याने खडकवासला धरणावरील २४० एमएलडी क्षमतेचे दोन पाण्याचे पंप पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल दुपारच्या सुमारास पोलिस बंदोबस्तामध्ये बंद केले. यापूर्वी देखील दोन वेळा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे महापालिकेला कोणतीही कल्पना न देता पाणी तोडले होते. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे महापालिकेत महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी समवेत बैठक पार पडली.
दरम्यान, पुण्याच्या पाणी कपातीविरोधात मनसेने खडकवासला अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात जाणाऱ्या पाण्याच्या पाईपची तोडफोड केली. मनसेच्या ३० ते ४० कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 17, 2019 5:04 pm