मागच्या साडेचार वर्षात आपण केलेली कामं प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेपर्यंत पोहोचवावी. निवडणुकीत जर कुठे मतं कमी पडली तर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना जबाबदार धरू नका. जर कुठे मतं कमी पडली तर तिथे तुम्ही आणि मी देखील जबाबदार असणार आहोत असे पुणे लोकसभेचे महायुतीचे उमदेवार आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले. या निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात बैठक पार पडली. यावेळी योगेश सागर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, शहर अध्यक्ष योगेश गोगावले, आमदार विजय काळे, भिमराव तापकीर, मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर तसेच भाजप आणि शिवसेना पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी गिरीश बापट म्हणाले की,ज्या कुटुंबाने आजवर साम, दाम, दंड, भेद ही नीती अवलंबून निवडणुका जिंकल्या आहेत. आता त्यांना यंदाच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने ही निवडणूक समजणार आहे. यंदा बारामती लोकसभा मतदारसंघामधील निवडणूक देशात इतिहास घडवणारी ठरणार असल्याचे सांगत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. मतदारसंघात प्रचार करताना चेहर्‍यावर खूप आव आणून काम करू नका. तुम्ही व्यवस्थित राहा म्हणजे सर्व व्यवस्थित होईल तसेच प्रत्येकाच्या कामाचे मूल्यमापन होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.