काँग्रेस नेते दिग्विजय सिंह हे दरवरर्षी प्रमाणे यंदाही आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांना माध्यम प्रतिनिधींनी विविध मुद्यांवरून प्रश्न विचारले. ज्यावर त्यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिली.

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीबाबत आपले काय मत आहे असे विचारण्यात आल्यावर दिग्विजय सिंह यांनी सांगितले की, मला या बद्दल काही माहिती नाही. पण भेटत राहील पाहिजे, राजकारणावर चर्चा केली पाहिजे. तर, काँग्रेस अध्यक्ष पदासाठी चर्चा सुरू आहे मात्र अध्यक्ष भेटत नाही असे विचारल्यावर अध्यक्ष भेटत नाही अस नाही, यासाठी सर्वजण सामान्य समिती स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम विषयी चर्चा झाल्याबद्दल बोलतांना मात्र त्यांनी अगदी विस्तृत उत्तर दिले. ते म्हणाले की, याबाबत एक बोलायचं आहे. काय कारण आहे की, भारत आणि काही विकसनशील देशातच ईव्हीएम वापर केला जातो. विकसीत देशात याचा वापर का होत नाही? युके, अमेरिका, जर्मनी, युरोपमध्ये ईव्हीएमचा वापर होत नाही. लोकशाही ही विश्वासावर अवलंबून आहे. राजकीय पक्षांनी लिहून दिलं आहे की, ईव्हीएमवर विश्वास नाही. तर मग हट्ट सोडला पाहिजे. ईव्हीएम बद्दल एवढं प्रेम असेल तर वोटर स्लिप जी निघते ती हातात द्या. तेव्हा कळेल की मतदान कोणाला झाल आहे. यासाठी आपण न्यायालयात, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाणार असून वोटर स्लिप हातात मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. तर कर्नाटकमधील राजकीय नाट्यावर बोलताना त्यांनी अप्रत्यक्षरित्या केंद्र सरकारवर टीका करत म्हटले की, त्यांच्याकडे खूप पैसे झाले आहेत. नोटाबंदी आणि अनेक ठिकाणाहून त्यांनी पैसे जमा केले आहेत, त्यामुळेच ते आमदारांना विकत घेत आहेत.