दुधाला १० रुपये तर भुकटीला ५० रुपये अनुदान सरकारने द्यावे, करोनाच्या संकटात ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था दुधाच्या व्यवसायामुळे टिकली आहे. मात्र गायीच्या दुधाचा भाव खूप खाली आला आहे. जर ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकरी वाचवायचा असेल, तर प्रत्येक लिटरला दहा रुपये अनुदान दिले पाहिजे व ते थेट खात्यात जमा केले पाहिजे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मावळमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले .
आणखी वाचा- करोनाच्या नावाखाली महाविकासआघाडी सरकारचा भ्रष्टाचार : चंद्रकांत पाटील
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, आमचं सरकार असताना आम्ही तीन वर्षे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पाच रुपये टाकायचो. त्यावेळी थोडा दर कमी होता आता तो एकदम खाली आला आहे. दुसरा उपाय असा आहे की त्याची पावडर केली पाहिजे. जगातले भुकटीचे दर पडल्यामुळे. एक्स्पोर्ट करणाऱ्यांना ५० रुपये प्रति किलो अनुदान दिलं तर भुकटी विदेशात जाईल. अशा दोन्ही मार्गाने दूध व्यवसाय वाचवला पाहिजे. सरकार या विषयामध्ये काही करायला तयार नाही, हे असंवेदनशील सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न अजून सोडवले गेले नाहीत. गायीच्या दुधाला ३० रुपये प्रति लिटर दर मिळाला पाहिजे. २० रुपये डेअरीकडून मिळत असतील तर दहा रुपये अनुदान तुम्ही द्या, २५ रुपये मिळाले तर ५ रुपये द्या असंही पाटील म्हणाले.
आणखी वाचा- मंत्र्यांसाठी गाड्या खरेदी करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? – भाजपा नेत्याचा सवाल
सरकारने शेतकऱ्यांना विरोधीपक्षांना आंदोलन करण्याची वेळच येऊ देऊ नये-
आम्ही तीन वर्षे शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति लिटर ५ रुपये द्यायचो. भुकटी निर्यात करण्यासाठी अनुदान देत होतो. आमच्या कार्यकाळात मराठा आरक्षण, शेतकऱ्यांची कर्ज माफी, दुधाला भाव, धनगर समाजाचे प्रश्न होते. तेव्हा, आम्ही त्यांना फार काळ आंदोलन करू दिली नाहीत. आम्ही तात्काळ प्रश्न सोडवले होते. या सरकारने शेतकऱ्यांना, विरोधी पक्षांना आंदोलनचं करायला लागू नये अशी धडाधड पॅकेज घोषित केली पाहिजेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 1, 2020 2:37 pm