अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आठ दिवसांत अध्यादेश काढू, अशी दहा महिन्यांपूर्वी घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा यासंदर्भात कायद्यात दुरुस्ती करणारा निर्णय येत्या एक महिन्यात काढू, अशी घोषणा रविवारी चिखलीत बोलताना केली. राजीनामा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी हा प्रश्न खूपच लावून धरला होता, अशी सूचक व खोचक टिप्पणी त्यांनी यावेळी केली.
चिखलीतील ‘घरकुल’ प्रकल्पाचे उद्घाटन व लाभार्थ्यांना हस्तांतरण केंद्रीय गृहनिर्माणमंत्री गिरिजा व्यास यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर मोहिनी लांडे, खासदार शिवाजीराव आढळराव, गजानन बाबर, आमदार विलास लांडे, प्रधान सचिव देबाशिष चक्रवर्ती, अरूणकुमार मिश्रा, संजीवकुमार, डी. एस. नेगी, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी विकास देशमुख, पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, प्राधिकरणाचे मुख्याधिकारी डॉ. योगेश म्हसे आदी उपस्थित होते. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार अनुपस्थित राहिले. तथापि, आतापर्यंत पालिकेच्या कार्यक्रमांना उपस्थित न राहणारे खासदार शिवाजीराव आढळराव व गजानन बाबर आवर्जून उपस्थित होते.
अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या निर्णयास विलंब होत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता असल्याचा मुद्दा विलास लांडे, शिवाजीराव आढळराव आणि अजित पवार यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला, त्याचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले, आमदारांनी हा प्रश्न लावून धरला. यासंदर्भात, अनेक शिष्टमंडळे आपल्याला भेटली. न्यायालयाच्या आदेशामुळे कायद्यात दुरुस्ती करून तोडगा काढावा लागणार आहे. हा नाजूक प्रश्न आहे, त्याचे स्वरूप ठरवण्यासाठी खूप समित्या नेमल्या, अभ्यासही बराच झाला. आता एक महिन्यात याबाबतचा ठोस निर्णय होईल. अजितदादा म्हणाले, अधिकाधिक नागरिकांना दिलासा मिळेल, असा व्यवहार्य तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे. नव्या समाविष्ट गावातील गायरानांच्या जागांवर घरकुलची घरे बांधण्याचा प्रयत्न राहील. ग्रामपंचायती सक्षम करण्याचा निर्णय शासनाने लवकर घ्यावा, अशी मागणी आढळराव यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले, आभार आयुक्त परदेशी यांनी मानले.
..अजितदादा खेकसले!
गजानन बाबर प्रेक्षकांमध्ये जाऊन बसले. मात्र, त्यांना व्यासपीठावर न बसवल्याबद्दल अजित पवार आयुक्तांवरच संतापले. योगेश बहल नागरिकांना ओढून-ताढून फोटोसाठी उभे करत होते, त्यांच्यावर अजितदादा खेकसले. संगणक क्षेत्रातील माहीतगार म्हणून गिरिजा व्यास यांनी राजीव गांधी व देशमुख असा उल्लेख केला, तेव्हा सर्वाना प्रश्न पडला की देशमुख कोण, अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना विचारले तेव्हा ते देखील अनभिज्ञ होते. व्यास यांना पृथ्वीराज चव्हाण यांचा उल्लेख करायचा होता. मात्र, त्या चव्हाण ऐवजी देशमुख म्हणाल्या असाव्यात, असे सांगण्यात आले.