चिंचवडमध्ये मावळ मतदार संघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थित रविवारी फोडण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते मंडळी उपस्थित होते. या सभेदरम्यान सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष पार्थ पवार यांच्या भाषणाकडे होते. परंतू, त्यांचं भाषण अडखळत झाल्याने विरोधकांसह राजकीय क्षेत्रातून त्यांच्या भाषणाची खिल्ली (ट्रोल) उडवण्यात आली. मात्र, यावर आज (बुधवार) पार्थ पवार यांनी प्रत्युत्तर दिलं असून मी कमी बोलतो आणि जास्त काम करतो, असे त्यांनी म्हटले. वडगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

पार्थ पवार म्हणाले, माझं ते पहिलं भाषण होतं, एक-दोन चुका झाल्या. मात्र, याचा अर्थ असा नाही की त्यावरच मी लक्ष केंद्रीत करायला हवं. काही लोक चांगली भाषणं करतात मात्र, काम करीत नाहीत. माझी काम करण्याची पद्धत मात्र वेगळी आहे. मी कमी बोलतो आणि काम जास्त करतो, अशा शब्दांत त्यांनी ट्रोलर्सना उत्तर दिलं.

पार्थ पवार यांचे आजोबा शरद पवार आणि वडील अजित पवार यांच्या उपस्थित रविवारी राजकीय कारकीर्दीतले पहिले भाषण झाले. माझं पहिलं भाषण आहे, ते ही शरद पवार आणि अजित पवार यांच्यासमोर त्यामुळं काही चुकलं तर सांभाळून घ्या, अशी विनंती त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच केली होती. त्यानंतर पार्थ यांनी अडखळतच आपले भाषण केले.