पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानाच्या दिवशी तुफान हाणामारी झाली होती. यात काही जण गंभीर जखमी देखील झाले आहेत. या घटनेप्रकरणी परस्पर विरोधी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू असवानी आणि शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचे जावई बबलू सोनकर याच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तुल आणि ११ जिवंत काडतुसे मिळाली आहेत. घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

बबलू सोनकर हा शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचा जावई आहे. आमदार गौतम चाबुकस्वार हे विधानसभा निवडणूक लढवत असून मतदानाच्या दिवशी बबलू हा पिंपरीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह चारचाकी गाडीतून फिरत होता. तेव्हा, आरोपी डब्बू असवानी यांच्या घरासमोर बबलू आणि इतर कार्यकर्ते जात होते, डब्बू असवानी यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने अडवून यातील बबलू सोनकर आणि सोबत असलेल्या इतर कार्यकर्त्यांना लाकडी दांडके आणि सिमेंटच्या गट्टूने बेदम मारहाण करण्यात आली, असं फिर्यादीत म्हटलं आहे.

या घटनेप्रकरणी राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक डब्बू असवानी यांना अटक करण्यात आली असून इतर तीन साथीदार फरार आहेत. त्यांच्याविरोधात जीव ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डब्बू असवानी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बबलू सोनकर यांच्यासह सात जणांच्या टोळक्याने माझ्यावर हल्ला केला. यातील काही जणांनी माझ्यावर पिस्तुल देखील रोखले.

आरोपी अरुण टाक, दीपक टाक यांनी मला धरून बबलू सोनकर यास मला जीवे मारण्यास सांगितले. त्यावेळी मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा, डब्बू यांच्या कार्यकर्त्यांना भांडणात पडू नये असं म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, यांच्याकडून दोन पिस्तुल ११ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहे. तीन जणांना अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.