पुणे शहरात आज दिवसभरात १६० नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. तर दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात आजअखेर ४ हजार ३४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणाऱ्या ३८८ रुग्णांची तब्येत ठीक झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आज अखेर १ लाख ५४ हजार १२८ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ७९ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, ४०९ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ८८ हजार ८७८ वर पोहचली असून यापैकी, ८५ हजार ८८४ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७६० असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

देशभरासह राज्यातील करोना संसर्गाचा वेग हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र, अद्यापही करोनाबाधितांच्या संख्येत रोज भर पडत आहेच. आज दिवसभरात राज्यात ३ हजार २७७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, सध्या राज्याचा मृत्यू दर २.६३ टक्के एवढा आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७ लाख २३ हजार १३५ झाली आहे.सध्या राज्यात १० लाख ३८ हजार ५०० जण गृह विलगीकरणात आहेत.