पुणे शहरात दिवसभरात १९८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या आजअखेर १ लाख ९२ हजार ३७९ संख्या झाली आहे. तर, आतापर्यंत ४ हजार ७६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ३०६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. आजपर्यंत १ लाख ८५ हजार ९८४ जण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ७६ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून, ५८ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, उपचारा दरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ लाख ५२८ वर पोहचली आहे. यापैकी ९६ हजार ७११ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५३८ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात आज देखील दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या दुपटीहून कितीतरी अधिक असल्याचे दिसून आले. राज्यात आज २ हजार ९९२ नवे करोनाबाधित आढळले तर ७ हजार ३० जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला. यामुळे आतापर्यंत राज्यातील करोनावर मात केल्याने डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या १९ लाख ४३ हजार ३३५ झाली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.५८ टक्के आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २० लाख ३३ हजार २६६ झाली आहे.