मिठाई विक्रेत्याच्या दुकानात जाऊन फुकट खाणे, किरकोळ विक्रेत्याला धमकावून पैसे उकळणे, पैसे न देणाऱ्यांना त्रास देणे अशा प्रकारच्या घटना शहरातील उपनगरांमध्ये वाढल्या आहेत. मात्र स्थानिक गुंडाच्या भीतीने अशा घटनांबाबत बऱ्याचदा किरकोळ व्यापारी पोलिसांकडे तक्रार देण्यास पुढे येत नाहीत असेही दिसून आले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन आता शहर पोलिसांनीच व्यापारी संघटनांच्या माध्यमातून उपनगरात मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील कोथरूड, वारजे, बिबवेवाडी, कात्रज, सिंहगड रस्ता या उपनगरांमध्ये किरकोळ व्यापाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. त्यांना त्रास देणारे तरुण हे स्थानिक असल्याने त्यांच्याविरुद्ध तक्रारी देण्यास किरकोळ विक्रेता धजावत नाही. उपनगरात वडापाव, पाणीपुरी, भेळ विक्रेते तसेच भाजी विक्रेत्यांकडून दररोज पैसे उकळले जातात. छोटय़ा व्यापाऱ्यांकडूनही पैसे घेतले जातात. पैसे उकळणारे तरुण हे परिसरातील गुंड टोळ्यांमध्येच काम करणारे असल्याचेही चित्र आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केल्यास व्यवसाय बंद होईल, अशी भीती किरकोळ विक्रेत्यांच्या मनात असते.
व्यापारी आणि काही किरकोळ विक्रेत्यांच्या तक्रारी वरिष्ठ पोलिस आधिकाऱ्यापर्यंत नुकत्याच आल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी आता उपनगरातील व्यापारी संघटनांच्या माध्यमातून मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. सिंहगड रस्त्यावरील व्यापारांचा मेळावा नुकताच घेण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, पंकज डहाणे, सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू जगताप यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. पोलीस अधिकाऱ्यांपुढे उपस्थित व्यापाऱ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला. पोलिसांनी व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांशी संवाद वाढवावा, अशी सूचनाही व्यापाऱ्यांनी या वेळी केली.
विक्रेत्यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर खाद्यपदार्थ विक्रेत्याला धमकावून फुकट खाले तर तो खंडणीचा गुन्हा ठरतो. व्यापारी असो वा किरकोळ विक्रेता एखाद्या गुंडाने धमकाविल्यास त्वरित नजीकचे पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्ष (दूरध्वनी-१००) येथे तक्रार करा, असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी या वेळी केले. सिंहगड रस्त्यावर व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळणाऱ्या बंटी पवार टोळीविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई केली असून गेल्या वर्षभरात पोलिसांनी १२० गुंडांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी न घाबरता तक्रारी कराव्यात, असेही पाटील यांनी या वेळी सांगितले. व्यापाऱ्यांनी दुकानात व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. त्यामुळे खंडणी मागणे किंवा चोरीची घटना घडल्यास गुन्हेगाराचा माग काढण्यास पोलिसांना मदत होईल, अशी सूचना पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी उपस्थितांना केली.