मल्टिप्लेक्समध्ये विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांसाठी अधिक पैसे आकारण्यात येत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज पुण्यात निषेध आंदोलन केले. सेनापती बापट रोडवरील पीव्हीआर मल्टिप्लेक्स येथे मनसे कार्यकर्त्यांनी धडक दिली. वाढीव दरात खाद्यपदार्थ का विकता? या प्रश्नावर पीव्हीआरच्या प्रशासनाने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे व्यवस्थापक आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे मनसे कार्यकर्ते अॅड. किशोर शिंदे यांनी सांगितले.

पाच रुपयांचे पॉपकॉर्न २५० रुपयांना कसे? १० रुपयांचा वडापाव शंभर रुपयांना कसा? असे फलक घेऊन आणि घोषणा देऊन मनसैनिकांनी सेनापती बापट रोडवरील PVR मध्ये घोषणाबाजी केली. यावेळी PVR च्या व्यवस्थापनाला निवेदनही देण्यात आले. यापूर्वीही अनेकदा या प्रश्नावर आवाज उठवूनही मल्टीप्लेक्स व्यवस्थापन आणि सरकारी यंत्रणा यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे मनसेने अखेर आंदोलनाचा पवित्रा उचलल्याचे किशोर शिंदे यांनी सांगितले. तसेच मनसेकडून मिळालेल्या निवेदनावर आपण लवकरच कार्यवाही करु, असे आश्वासनही यावेळी PVRच्या व्यवस्थापनाने दिल्याचे त्यांनी सांगितले.

मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. किशोर शिंदे, रमेश परदेशी आणि मनसैनिकांनी हे निषेध आंदोलन केले. तसेच PVRच्या प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होते की नाही याचा पाठपुरावा मनसे चित्रपट कर्मचारी सेना करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. तसेच खाद्यपदार्थांचे दर कमी झाले नाहीत तर हे आंदोलन मनसे स्टाईल झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या दरावरुन मुंबई हायकोर्टाने बुधवारी राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांवर राज्य सरकारचे नियंत्रण का नाही, ५ रुपयांचे पॉपकॉर्न २५० रुपयांना का?, असा सवाल हायकोर्टाने विचारला होता. जर बाहेरचे खाद्यपदार्थ सुरक्षेच्या कारणाखाली ग्राहकांना आणता येत नसतील तर या पदार्थ्यांच्या दरांवर सरकारचे नियंत्रण नको का, असा सवाल कोर्टाने विचारला होता.