देशभक्तीपर गीतांचे श्रवण, ध्वजारोहण झाल्यानंतर केलेले सामुदायिक ध्वजवंदन, रक्तदान शिबिरांसह विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या आयोजनाने ६९ वा स्वातंत्र्यदिन सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ६९ व्या वर्धापनदिनानिमित्त विधान भवन प्रांगणात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पालकमंत्री गिरीश बापट, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, महापौर प्रशांत जगताप, आमदार भीमराव तापकीर, सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, नोंदणी महानिरीक्षक एस. रामस्वामी, यशदाचे महासंचालक आनंद लिमये, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला या वेळी उपस्थित होत्या. राज्यपालांनी स्वातंत्र्यसैनिकांना शुभेच्छा दिल्या. शनिवारवाडा येथे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झाले. अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे या वेळी उपस्थित होते. वानवडी येथील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे झालेल्या कार्यक्रमात ब्रिगेडियर ए. के. त्यागी यांनी देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करताना हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण केली. स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेकांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे दर्शन घेतले.
‘आझादी के ७० साल’ चे औचित्य साधून शहर भाजपतर्फे कारगिल युद्धामध्ये लढलेले कर्नल (निवृत्त) ललित राय यांच्या निवासस्थानी दीपोत्सव आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते तिरंगी उपरणे आणि स्मृतिचिन्ह देऊन राय यांचा सत्कार करण्यात आला. शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार जगदीश मुळीक, उदय जोशी, अशोक येनपुरे, उज्ज्वल केसकर, गणेश घोष, महेंद्र गलांडे या वेळी उपस्थित होते. ललित राय यांना विश्वबंधुत्वाची राखी बांधून रक्षाबंधन साजरे झाले. राय यांनी कारगिल युद्धाच्या आठवणी जागविल्या.
काँग्रेस भवन येथील कार्यक्रमात शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, उपमहापौर मुकारी अलगुडे, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार उल्हास पवार यांच्यासह आजी-माजी नगरसेवक-कार्यकर्ते उपस्थित होते. शिवदर्शन येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये मेजर निखिल घोरपडे यांचा सहभाग होता. राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागातर्फे ताडीवाला रस्ता येथे आनंद सवाणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करून लहान मुलांना खाऊवाटप करण्यात आले.
नू.म.वि. मुलांच्या प्रशालेत दहावीमध्ये प्रथम आलेला सचिन धारणकर या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, मुख्याध्यापिका आशा रावत, उपमुख्याध्यापिका संजीपनी ओमासे या वेळी उपस्थित होत्या. परिवर्तन सामाजिक बहुउद्देशीय संस्था, जनता दल धर्मनिरपेक्ष, मराठा मित्र मंडळ, जागृत हनुमान सेवा ट्रस्ट, फुले-साठे-आंबेडकर विचार फाउंडेशन, शौर्य प्रतिष्ठान, राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ, कृष्णाई महिला मंडळ, प्रियदर्शिनी शिक्षण संस्था, मृत्युंजय मित्र मंडळ, १५ ऑगस्ट चौक आणि पुणे मीडिया वॉच यांच्यातर्फे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.