२.३४ लाखांपैकी ७० हजार उत्पादन प्रकल्प सुरू

पुणे : उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार १४ जुलै ते २३ जुलै या काळात पुण्यात नव्याने टाळेबंदी करण्यात आली. या काळात जिल्ह्य़ातील २.३४ लाख उद्योगांपैकी के वळ ७० हजार उत्पादन

प्रकल्प मोजक्या कामगारांच्या उपस्थितीत कसेबसे सुरू असल्याचे समोर आले आहे. तर, ३३ टक्के  कामगारांची उपस्थिती अपेक्षित असताना केवळ ९० हजारांच्या आसपास मनुष्यबळ टाळेबंदीत कामावर जाऊ शकले आहे. परिणामी नव्या टाळेबंदीमुळे पुण्यातील उद्योग विश्व पुन्हा एकदा अडचणीत आले आहे.

उद्योगधंद्यांच्या बाबतीत पुणे जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. मात्र, सुरुवातीच्या टाळेबंदीत सर्व उद्योग बंद ठेवण्यात आले होते. टाळेबंदीत शिथिलता देण्यात आल्यानंतर उद्योगांची गाडी हळूहळू रुळावर येत आहे, असे वाटत असतानाच प्रशासकीय अधिकारी, व्यापारी आणि उद्योजकांचा विरोध असतानाही पालकमंत्री पवार यांच्या आग्रहामुळे १४ ते २३ जुलै या काळात पुन्हा टाळेबंदी लागू करण्यात आली. या काळात उद्योग बंद ठेवण्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जाहीर के ले.

मात्र, बंदिस्त वाहनातून अधिकारी, कामगारांना कामावर ने-आण करणे, उद्योगांना परवाने देण्याबाबत प्रशासकीय गोंधळ अशा विविध कारणांमुळे उद्योग पूर्ण क्षमतेने कार्यरत झालेच नाहीत.

टाळेबंदीतील पहिल्या पाच दिवसांत म्हणजेच १४ ते १८ जुलै या कालावधीत ३३ टक्के  उपस्थितीत उद्योग सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, कर्मचारी उपस्थितीचे प्रमाण सध्या के वळ १५ ते २० टक्के  होते.

नेमकी समस्या काय?

ग्रामीण भागात पाचपेक्षा अधिक करोनाचे रुग्ण आढळल्यास संपूर्ण गावच प्रतिबंधित क्षेत्र करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला आहे. परिणामी ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रातून अधिकारी, कामगारांना कामावर जाता येत नाही. तसेच १४ जुलै ते २३ जुलै या काळात टाळेबंदी लागू करताना पुणे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत आणि हवेली तालुक्याचा समावेश होता. त्यामुळे या पुणे, पिंपरी-चिंचवडच्या लगतच्या गावांमध्येही टाळेबंदी आहे.

केवळ ९० हजार कामगारांची उपस्थिती

पुणे जिल्ह्य़ातील विविध उद्योगांची संख्या दोन लाख ३४ हजार ६७७ असून साडेसोळा लाख कामगार आहेत. त्यामध्ये मोठे उद्योग ६७७ आणि लघु, मध्यम व सेवा उद्योगांची संख्या दोन लाख ३४ हजार आहे. तर, ४५० मोठे आणि नोंदणीकृ त लहान १४०० माहिती तंत्रज्ञान युनिट आहेत. हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्कमध्ये १४६, तर इतर ठिकाणी ७२ माहिती तंत्रज्ञान युनिट आहेत. यापैकी टाळेबंदी काळात के वळ ७० हजार उत्पादन प्रकल्प सुरू होते, तर त्यामधून के वळ ९० हजारांच्या आसपास कामगार कामावर जाऊ शकले.