News Flash

नव्या पाहुण्यांच्या ‘अतिक्रमणा’मुळे भाजपमध्ये गृहकलह

महापालिका निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, संग्रहित छायाचित्र

महापालिका निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तशा प्रभागांमध्ये गमतीदार घडामोडी होताना दिसत आहेत. प्राधिकरण-आकुर्डी प्रभागात तेच चित्र आहे. भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या शब्दावर विश्वास ठेवून सहा वेळा नगरसेवक राहिलेले माजी महापौर आर. एस. कुमार राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आले. त्याच वेळी खासदार अमर साबळे यांनी राष्ट्रवादीचेच माजी नगरसेवक धनंजय काळभोर यांनाही भाजपमध्ये आणले. बाळा िशदे यांचा यापूर्वीच गृहप्रवेश झाला आहे. या पाहुण्यांचे ‘अतिक्रमण’ भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांना नको आहे. त्यामुळे उमेदवारीवरून भाजपमध्ये ‘गृहकलह’ होणार असल्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

सुशिक्षित व उच्चभ्रूंचे वास्तव्य असलेल्या व सद्य:स्थितीत राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या प्राधिकरण प्रभागाकडे भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. सातत्याने निवडून येणाऱ्या कुमार यांना भाजपने उमेदवारीची ‘ऑफर’ दिली, त्यावरून बऱ्याच घडामोडी सुरू झाल्या आहेत. कुमार राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आल्यास स्थानिक समीकरणे बदलणार आहेत. संघ परिवारातील अमोल थोरात यांचा कुमारांना तीव्र विरोध आहे. पक्षाकडे अनेक कार्यकर्ते असताना ‘आयात’ उमेदवार कशासाठी, असा त्यांचा मुद्दा आहे. विरोधानंतरही पक्षपातळीवर कुमारांचे ‘प्रमोशन’ सुरू झाले आहे. बाळा िशदे यांनाही थोरांताचा विरोध डावलून भाजपमध्ये आणण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत धनंजय काळभोरही भाजपवासी झाले. प्राधिकरणात खुल्या गटासाठी एकच जागा असून त्यावर या सर्वाचा डोळा असल्याने उमेदवारीची स्पर्धा तीव्र झाली आहे. शहराध्यक्ष जगताप व खासदार साबळे उमेदवारीचा अंतिम निर्णय घेणार आहेत. मात्र, त्यांच्यात एकवाक्यता होण्याची शक्यता कमी आहे.

पालिकेच्या २००२ च्या निवडणुकीत बाळा िशदे यांनी कुमार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती व ते पराभूत झाले होते. पुढे ते काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेले. आझम पानसरे यांच्या नेतृत्वाखाली बरेच दिवस काम केल्यानंतर आता ते भाजपमध्ये आले. सध्या ते खासदार साबळे यांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत. कुमार भाजपच्या उंबरठय़ावरच होते. मात्र, काळभोर यांचा बारामतीत भाजप प्रवेश होताच कुमार यांचाही घाईने प्रवेश करवून घेण्यात आला. जागा एक आणि दावेदार अनेक, यामुळे प्राधिकरणात भाजपमध्ये चढाओढ सुरू आहे. उमेदवारी मिळणार, असा प्रत्येकाला विश्वास आहे. त्यातच, ओबीसी पुरुष व खुल्या गटातील महिलांच्या दोन जागा आहेत. त्यावरून वेगळ्याच घडामोडी प्रभागात सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 2:32 am

Web Title: internal conflict in bjp 2
Next Stories
1 चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकाकडून पस्तीस लाख रुपयांचा अपहार
2 बोलताना काळजी घ्या !
3 कर जमा; पण थकबाकीदारांचा प्रश्न कायम
Just Now!
X