इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचे पुणे संधान एका तरुणीच्या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. दहावीत नव्वद टक्के गुण मिळवून अकरावीला विज्ञान शाखेत शिकणारी पुण्यातील एक सोळा वर्षांची मुस्लीम समाजातील तरुणी सोशल नेट वर्किंगच्या माध्यमातून या दहशतवादी संघटनेच्या जाळ्यात ओढली गेली. २०१७ मध्ये ती या संघटनेत प्रत्यक्षात सहभागीही होणार होती. मात्र, वेळीच हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्याने तिचे कुटुंबीय व धर्मगुरूंच्या मदतीने पोलीस तिला या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याचे प्रयत्न करीत असून, त्यासाठी तिचे समुपदेशन करण्यात येत आहे.
दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख विवेक फणसाळकर व पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांना मिळालेल्या माहितीनुसार इसिसच्या सोशल नेट वर्किंगमध्ये पुण्यातील तरुणी आल्याचे समजले होते. त्यानुसार गुप्तचर व तांत्रिक पद्धतीने या प्रकरणाची तपासणी करण्यात आली. त्यातून संबंधित तरुणीला हेरण्यात आले. मागील चार महिन्यापासून या तरुणीचा स्वभाव पूर्णपणे बदलला होता. साधे कपडे किंवा जिन्स पॅन्ट घालणाऱ्या या तरुणीने नेहमी बुरखा घालण्यास सुरुवात केली होती.
पोलिसांच्या तपासात उघड झालेल्या माहितीनुसार वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या वृत्तांमधून तिला इसिसबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तिने या संघटनेचा शोध घेतला. त्यातून इसिसचे ऑनलाईन काम करणाऱ्या काहींशी तिचा संपर्क झाला. त्यानंतर त्यांच्यात फेसबुक, वॉट्स अॅप आदींच्या माध्यमातून संभाषण सुरू झाले. फेसबुकवर तिचे दोनशे मित्र आहेत. त्यातील काही संशयित असून, ते इसिसचे ऑनलाईन काम करणारे आहेत. त्यात भारत व इतर देशांतील लोकांचाही समावेश आहे. राजस्थान, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, जम्मू- काश्मीरसह श्रीलंका, केनिया व फिलिपिन्स येथील काहींचा त्यात समावेश आहे. इसिसच्या संपर्काबद्दल राजस्थानमधील महोम्मद सिराजुद्दीन या तरुणाला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. हा तरुणही पुण्यातील या तरुणीच्या फेसबुक मित्रांच्या यादीत आहे. वर्किंग
इसिसमध्ये २०१७ मध्ये सहभागी होण्यासाठी तिने सीरिया येथे जाण्याचीही तयारी सुरू केली होती. तिथे तिला वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश व सर्व खर्च करण्याचे आमिषही दाखविण्यात आले होते. पण, त्यासाठी भारतात काहीही करायला तयार राहिले पाहिजे, असे तिला कळविण्यात आले होते. पोलिसांनी चौकशी बोलविल्यास कशा पद्धतीने उत्तरे द्यायची व ग्रुपमध्ये कोणत्याही सदस्याशी फोनवर थेट न बोलता सोशल नेटवर्कीगच्या माध्यमातूनच संपर्क साधण्याच्या सूचनाही तिला देण्यात आल्या होत्या.
पोलिसांना या सर्व गोष्टी तपासातून कळाल्यानंतर त्यांनी तरुणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला व कुटुंबीयांना याची माहिती दिली. या माहितीमुळे कुटुंबाला धक्काच बसला. पोलिसांनी सध्यातरी तिच्यावर गुन्हा दाखल न करता तिला यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. अधिकारी व धर्मगुरू तिचे समुपदेशन करीत आहेत. कुराण व इस्लामची खरी शिकवणूक तिला सांगण्यात येत असून, एका आठवडय़ामध्ये तिच्यात बराचसा फरक पडला असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्या फेसबुक संपर्कात असलेल्या राज्यातील व देशातील संशयीतांची माहिती त्या-त्या भागातील पोलिसांना देण्यात आली आहे.

मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन
इसिसच्या संपर्कात आलेल्या तरुणीबाबत बोलताना दहशतवादी विरोधी पथकाचे सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी सांगितले की, इसिसकडून अल्पवयीन मुले व मुलांना भडकविण्यात येत आहे. त्यातूनच ही तरुणी इसिसच्या संपर्कात आली होती. त्यामुळे पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या राहणीमानातील बदल, सोशल नेटवर्किंग साईट्सवरील त्यांचे अकाऊंट, महाविद्यालयातील व बाहेरचे मित्र याची माहिती पालकांनी ठेवली पाहिजे. काही संशयास्पद वाटल्यास त्याबाबत पोलिसांना माहिती द्यावी.