News Flash

नोकरीसाठी अर्ज न करताच नियुक्तीपत्र आले तर सावधान…

नोकरीसाठी अर्ज न करता देखील नोकरी लागल्याचे नियुक्तीपत्र आल्यामुळे तरूण अंचबित झाला..

| June 25, 2015 03:15 am

व्यवस्थापन शाखेच्या (एमबीए) पहिल्या वर्षांचे शिक्षण झाल्यानंतर एका तरूणाला केंद्राच्या रोजगार भरती कार्यालयात नोकरी लागल्याचे नियुक्ती पत्र मिळाले.. नोकरीवर हजर होण्यापूर्वी अकरा हजार रुपये बँकेत भरण्यास सांगण्यात आले.. नोकरीसाठी अर्ज न करता देखील नोकरी लागल्याचे नियुक्तीपत्र आल्यामुळे तरूण अंचबित झाला.. त्याने नियुक्तीपत्रावरील संकेतस्थळ व पत्त्याची खात्री केली असता हे सर्व बनावट असल्याचे लक्षात आले. आता याबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.
गणेश रवींद्र खमितकर (रा. मॉडेल कॉलनी) या विद्यार्थ्यांला बनावट नियुक्तीपत्र आले. गणेश मॉडर्न महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत आहे. गेल्या आठवडय़ात त्याला केंद्र शासनाच्या दिल्ली येथील स्वर्णजयंती स्वरोजगार भरती कार्यालयात ग्राहक सेवा प्रतिनिधी पदाची नोकरी लागल्याचे नियुक्तीपत्र आले. या नियुक्तीपत्रावर केंद्र शासनाचे लोगो वापरलेले आहेत. गणेश याने नोकरीसाठी आतापर्यंत कोठेही अर्ज केलेला नसताना हे नियुक्तपत्र आल्यामुळे त्याला संशय आला. या नियुक्तीपत्रात प्रतिमहिना तीस हजार रुपये वेतन दिले जाईल, काम कशा स्वरूपाचे असेल, याची माहिती दिली आहे. तसेच, नियुक्तीपत्रासोबत एक कोरा अर्ज दिला असून त्यावर संपूर्ण माहिती, फोटो आणि दहा हजार आठशे रुपये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर भरण्यास सांगण्यात आले. गणेश याने नियुक्तीपत्रावर असलेले संकेतस्थळ व पत्त्याबाबत संकेतस्थळावरून माहिती काढली. त्यावेळी दिलेले संकेतस्थळ हे खासगी स्वरूपाचे असल्याचे आढळून आले. तसेच, दिलेले पत्ते देखील वेगवेगळ्या ठिकाणाचे होते. त्यामुळे त्याने पैसे भरले नाहीत. त्यानंतर  गणेश याला पैसे भरावे म्हणून फोन देखील आला.
नियुक्तीपत्राच्या प्रकारात काहीतरी गौडबंगाल असल्यामुळे गणेश याने शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण यांना प्रकार सांगितला. याबाबत त्यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना नोकरीच्या आमिषाने फसविणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी निम्हण यांनी केली आहे. शहरात तरूणांना बनावट नियुक्तीपत्र पाठवून नोकरीवर हजर होण्यासाठी पैसे भरण्यास सांगून फसवणूक केल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत काही पोलीस ठाण्यांना तक्रार देखील केलेली आहे. पण, त्याचे पुढे काहीच न झाल्यामुळे नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणारी टोळी अद्यापही कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2015 3:15 am

Web Title: job fack mba call letter police crime
टॅग : Job,Mba
Next Stories
1 एआयसीटीईच्या संचालकपदी डॉ. अनिल सहस्रबुद्धे
2 शिवाजी पुलाचा सिमेंटचा लेप कोसळून एक जखमी
3 वर्गात शिक्षक राहतील एवढे यंदा पाहा..
Just Now!
X