News Flash

प्रेरणा : कौशल्यांचा समाजोपयोग

कौशल्यांचा वापर आपण नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने पैसा मिळविण्यासाठी करतो.

ज्योती जोशी

श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com

आपला वेळ आणि कौशल्यांचा वापर करण्याची संधी ही काम करणाऱ्यासाठी जेवढी आनंददायी असते, तेवढीच ती समाजोपयोगीदेखील ठरते. मराठीबरोबरच इंग्रजीवरही प्रभुत्व, वाचनाची आवड असणाऱ्या ज्योती जोशी यांना मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या मासिकासाठी संपादक म्हणून कार्य करण्याची संधी तर मिळालीच, त्याबरोबरच त्यांनी अनुवादाची अनेक कामे कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता वेळेत पूर्ण केली. गरजवंत मुलांना शिकवण्यातही त्या अग्रेसर आहेत.

तुमच्या आमच्यामध्ये नानाविध कौशल्यं असतात. त्या कौशल्यांचा वापर आपण नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने पैसा मिळविण्यासाठी करतो. काहींना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते, पण काहींना त्यांच्या मनाविरुद्ध आणि इच्छेविरुद्ध पैसा मिळवायचा आहे म्हणून काम करावे लागते. अंतिम ध्येय काय? तर केवळ आणि केवळ पैसा मिळवणे. दुसऱ्या बाजूला आपल्याकडे आवश्यक तेवढा पैसा आणि पुरेसा वेळ आहे. अशा वेळी आपण बहुतांशवेळी त्या वेळेत आराम करणे किंवा स्वत:साठीच आणि स्वत:पुरतेच जगणे पसंत करतो. पण त्या वेळेचा सदुपयोग समाजासाठी करता आला आणि आपली आवडही जोपासली गेली तर? यातच आपल्या कौशल्यांचाही सुयोग्य वापर होत असेल, तर सोन्याहून पिवळे. आपल्या वेळेचा सदुपयोग करताना आपल्या कौशल्यांचा वापर करण्याची आणि पर्यायाने ती विकसित करण्याची संधी मिळाली, ती ज्योती चंद्रकांत जोशी यांना.

लेखन, वाचनाची आवड असणाऱ्या आणि एम.ए.मराठी, एम.फील झालेल्या ज्योतीताई लग्नानंतर नागपूर येथील आर्वी गावातून पुण्यात स्थायिक झाल्या. दोन लहान मुलांचे संगोपन करीत असताना दिवस पुढे सरकत होते. त्यांचे लहानपणापासूनच मराठीबरोबरच इंग्रजीवरही प्रेम. यामध्ये वेळ मिळेल तेव्हा आणि जे मिळेल ते वाचण्याचा छंद. पती टाटा मोटर्समध्ये नोकरीला. मुलांचे संगोपन करण्यात, संसार सांभाळण्यामध्ये व्यस्त असणाऱ्या ज्योतीताईंना आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी योगायोगानेच मिळाली. १९८२ मध्ये जाणीव संघटनेबरोबरच १९८४ साली मुलांसाठी ‘निर्मळ रानवारा’ मासिकाचा प्रारंभ करणारे विलास चाफेकर यांनी ज्योतीताईंचे गुण हेरले. त्यावेळी ज्योतीताई आवड म्हणून ‘टाटा मोटर्स’ च्या ‘कलासागर’ अंकातून लेखन करीत होत्या. त्यांनी लिहिलेल्या ज्येष्ठ नागरिकांवर आधारित ‘बक्षिसी’ या कथेला शांता शेळके यांच्या हस्ते बक्षीसही मिळाले आणि शांताबाईंनी आपल्या भाषणात या कथेचा उल्लेखही केला होता. त्यांची ही लेखन वाचनावरची निष्ठा पाहून चाफेकर यांनी त्यांना मुलांसाठीच्या मासिकासाठी काम करण्याचे निमंत्रण दिले. या निमंत्रणाचा स्वीकार करीत ज्योतीताईंनी १९८८ पासून  ‘निर्मळ रानवारा’ च्या सल्लागार मंडळांच्या बैठकांना जाण्यास सुरुवात केली. त्यांचे काम ज्येष्ठ साहित्यिका सरिता पदकींना भावले. ज्योतीताईंचे काम जोमाने सुरू झाले. चार्ल्स डिकेन्स यांचे ‘डेव्हिड कॉपरफिल्ड’ या पुस्तकाचा अनुवाद सरिताताईंच्या आग्रहामुळे ‘सर्कस डॉक्टर’  मासिकामधून क्रमश: प्रकाशित झाला. पुढे याचे पुस्तकही निघाले. ‘डेव्हिड कॉपरफिल्ड’ हे पुस्तक एका विद्यापीठात अभ्यासासाठी होते. त्यावेळी ज्योतीताईंच्या अनुवादाचा या मुलांना उपयोग होत असल्याचे दूरध्वनीही आले. आपण केलेल्या कामाचे त्यांना समाधान वाटले. कोणत्याही मानधनापेक्षाही या सगळ्या कामाचे समाधान वाटणे इतकेच त्यांचासाठी महत्त्वाचे होते. रानवारासाठीचे काम सुरू केल्यापासून आज बावीस वर्षांनंतरही त्या आवड, वेळेचा आणि कौशल्यांचा सदुपयोग म्हणून हे काम करत आहेत.

‘वंचित विकास’ या सामाजिक संस्थेमार्फत मुलांसाठी प्रकाशित होणारा ‘निर्मळ रानवारा’ हा अंक मुलांबरोबरच, पालक आणि शिक्षकांच्याही पसंतीस उतरला. यामागचे एक कारण म्हणजे मुलांना लेखनास प्रवृत्त करणे हे जसे आहे तसेच मुलांना केवळ प्रबोधनाचीच नाही, तर मनोरंजनाचीदेखील गरज असल्याचे भान बाळगणे हेही आहे. हे साध्य झाले ते ज्योतीताई आणि त्यांच्या आधीपासून संपादक म्हणून काम करणाऱ्यांमुळे तसेच सल्लागार मंडळामुळे. बावीस वर्ष कोणत्याही मानधनाशिवाय कार्य करणे हे ज्योतीताईंचे वैशिष्टय़ आहेच. पण त्याबरोबरच मुलांना मासिक आपले वाटावे, यासाठी सतत प्रयोगशील आणि प्रयत्नशील राहणेदेखील तेवढेच महत्त्वाचे. याशिवाय त्या मासिकातर्फे देण्यात येणाऱ्या कृतज्ञता पुरस्कारासाठी किंवा इतरही पुरस्कांसाठीही मानपत्रे तयार करणे, संस्थेच्या इतर लेखनविषयक कार्यात मदत करणे, या कामांसाठीदेखील त्या कायम तत्पर असतात. या संस्थेबरोबरच त्यांनी ‘क्राय’ या सामाजिक संस्थेसाठीदेखील अनुदानाचे काम कोणत्याही अपेक्षेशिवाय करून दिले आहे. आलेल्या रुग्णांकडे केलेल्या उपचारानंतर अव्वाच्या सव्वा पैसे न घेता किंवा कधी कधी फुकट, अत्यल्प पैशातही ज्योतीताईंच्या डॉक्टर वडिलांनी उपचार केले. ज्येष्ठ साहित्यिक अ. ना. देशपांडे हे ज्योतीताईंचे काका. वडील तसेच काकांच्या संस्कारांमधून आपली सामाजिक आणि सांस्कृतिक जाण विकसित होत गेली असावी, असे ज्योतीताईंना वाटते.

ज्योतीताईंनी संपादक म्हणून काम पाहायला सुरुवात केल्यानंतर १९९६ च्या दिवाळीसाठी पहिला अंक ‘स्वातंत्र्य’ विशेषांक केला. या अंकासाठी ‘स्वतंत्र झालो आम्ही’ हे पथनाटय़ लिहिले होते, ते आजही अनेक ठिकाणी मुले संमेलनांमधून सादर करतात. मराठी भाषेच्या प्रसारामध्ये आणि ती योग्य पद्धतीने शिकवण्यामध्येदेखील ज्योतीताई तेवढय़ाच हिरिरीने सहभागी होतात. परदेशातील मुलामुलींना, परभाषिक व ज्यांना गरज असेल त्यांनाही त्या मराठी तेवढय़ाच आत्मीयतेने शिकवतात, तेही त्या लोकांची गरज म्हणून. गरजवंत मुलांच्या गरजेनुसार मराठी, इंग्रजी किंवा मुलांना हवे ते शिकविण्यात ज्योतीताई कधी मागे हटल्या नाहीत. आपल्याला कितीही त्रास झाला तरी कधीही नाही म्हणायचे नाही, अशी वृत्ती असणाऱ्या ज्योतीताईंनी संस्थेतील मुलीला जसे इंग्रजी शिकवले तसेच सोसायटीत काम करणाऱ्यांच्या मुलांपासून विविध आर्थिक पातळीवरील मुलांना त्यांच्या-त्यांच्या गरजेनुसार  शिकवले. जे काही काम करायचे ते मनापासून, अभ्यास करून आणि योग्यच पद्धतीने पूर्ण करण्याची ज्योतीताईंची हातोटी. ज्योतीताई जेव्हा संपादक होत्या, तेव्हा आजच्या एवढी संपर्क माध्यमं विकसित नव्हती आणि मुलांसाठी लेखन करणाऱ्या लेखकांची वानवा होती. अशा परिस्थितीतही त्यांनी आज आघाडीचे असणाऱ्या अनेक लेखकांच्या घडण्यात मदत केली.

लेख मिळविण्यापासून त्यांच्यावर संपादकीय संस्कार करणे, मासिकामध्ये ते प्रकाशित होण्यासाठी जे-जे काही काम करावे लागे, ते सुहास्य वदनाने, गोड शब्दांनी आणि वेळेत पूर्ण करण्याची ज्योतीताईंची हातोटी. यातून आजपर्यंत ‘निर्मळ रानवारा’ चे संपादकपद त्यांनी विनासायास भूषविले आणि लहान मुलांमध्ये वाचनाची आवड विकसित व्हावी म्हणून कायम प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नात तुम्हालाही सहभागी व्हायचे असेल तर ९०११५१३२५६ हा क्रमांक तुमचा मदतनीस होऊ शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 2:31 am

Web Title: jyoti joshi work for creating reading hobby in children
Next Stories
1 ठोस कचरा व्यवस्थापनासाठी दोन कोटींची हमी द्या
2 अप्रशिक्षित आहारतज्ज्ञांचा सुळसुळाट
3 हॉटेलमध्ये खाद्यासोबत आहारतज्ज्ञांचीही फौज!
Just Now!
X