नवनियुक्त पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी सूत्रे स्वीकारली

पुणे : महाराष्ट्राची  सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात काम करण्याची संधी मिळणे म्हणजे बहुमान आहे. येत्या काही दिवसांत शहरातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, पोलीस अधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधून शहरातील समस्या जाणून घेतल्या जाईल, असे नवनियुक्त पोलीस आयुक्त के. वेंकटेशम  यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडून पोलीस आयुक्त वेंकटेशम यांनी शुक्रवारी सूत्रे स्वीकारली. पोलीस आयुक्त वेंकटेशम यांनी पोलीस आयुक्तालयाची पाहणी केली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की पुणे शहराला सांस्कृतिक परंपरा आहे. या शहरात काम करण्याची संधी हा बहुमान आहे. पोलीस आयुक्त म्हणून शहरासाठी काय योगदान देता येईल किंवा काय उपाययोजना करण्यात येतील, हे आताच जाहीर करणे योग्य ठरणार नाही. सर्वप्रथम शहराची पाहणी केली जाईल. कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न जाणून घेण्यात येतील. विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधण्यात येईल. त्यांचे मत विचारात घेतले जाईल, त्यानंतर पुढील दिशा ठरविण्यात येईल.

गुंडांना इशारा

शहरातील गुंडगिरीचा बीमोड करण्यासाठी काय उपाययोजना करणार आहात, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर पोलीस आयुक्त वेंकटेशम यांनी सूचक भाष्य केले. ‘गुंडांनी गुंडगिरी सोडावी’, असा सूचक इशारा त्यांनी दिला.