मुंबई- बंगळुरु महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्याची डागडुजी करण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. बोगद्यालगत असणाऱ्या डोंगरावरुन दरडी कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने तेथे लेप लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

मुंबई- बंगळुरु महामार्गावर जुना कात्रज आणि नवीन कात्रज बोगदा आहे. या रस्त्यावर पडणारा वाहतुकीचा ताण विचारात घेऊन बाह्य़वळण मार्ग ( किवळे ते कात्रज) काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. त्यामुळे मुंबईहून येणारी वाहने पुणे शहरात न येता थेट बाह्य़वळण मार्गाने नवीन कात्रज बोगद्यातून खेडशिवापूरला येतात. सिंहगड रस्ता, कोथरुडच्या दिशेने जाणारी वाहने याच रस्त्याचा वापर करतात. जुना कात्रज बोगदा आणि नवीन कात्रज बोगद्याचा वापर दररोज चाळीस हजार वाहने करतात. डोंगर फोडून हे दोन्ही बोगदे तयार करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नवीन कात्रज बोगद्यातील दिवे बंद पडले होते. त्यामुळे तेथे अपघात होण्याची शक्यता होती. नवीन कात्रज बोगदा साधारणपणे दीड किलोमीटर आहे. अंधार असल्यामुळे हजारो वाहनचालक जीव मुठीत धरुन हा बोगदा पार करायचे. त्यामुळे या रस्त्याची कामकाज पाहणारी रिलायन्स कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग आधिकाऱ्यांनी  बोगद्याची काही दिवसांपूर्वी पाहणी केली. या परिसरात तातडीने कामे सुरु करण्यात आली असून पावसाळ्यापूर्वी ही कामे केली जाणार आहेत, अशी माहिती रिलायन्स आणि राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. बोगद्यालगतच्या डोंगरावरुन दरडी कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेथे दरडी कोसळण्याची शक्यता आहे, तेथे लेप लावण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. बोगद्यातील दिवे तातडीने दुरुस्त करण्यात आले आहेत. बोगद्यात एकूण दहा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. काही कॅमेरे बंद पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे कॅमेरे तातडीने दुरुस्त करण्यात येणार आहेत. पुढील आठवडय़ात हे कॅमेरे सुरु होतील, असे सांगण्यात आले. बोगद्यातील तुटलेले लोखंडी कठडे नव्याने बसविण्यात आले आहेत तसेच रिफ्लेक्टर्स, रंगरंगोटीची कामे करण्यात आली आहेत.

वाहिन्यांची सफाई

तीन वर्षांपूर्वी खेडशिवापूर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नवीन बोगद्यालगतच्या भागात डोंगरावरुन प्रचंड पाणी आले होते. त्यामुळे तेथे पाणी साचले आणि मोटारी बुडाल्या होत्या. त्या वेळी पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे माय-लेकी वाहून गेल्याची दुर्घटना घडली होती. पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची डागडुजी न केल्याने ही दुर्घटना घडली होती. तेव्हापासून या परिसरातील वाहिन्यांची पावसाळ्यापूर्वी डागडुजी करुन त्या साफ केल्या जातात. नुकतीच ही कामे पूर्ण करण्यात आली असून तहसीलदारांकडून या कामांची पाहणी देखील करण्यात आली आहे, अशी माहिती रिलायन्स कंपनीच्या अभियंत्यांनी दिली.

  • दरडी कोसळण्याची शक्यता गृहीत धरुन डोंगरांना लेप
  • नवीन बोगद्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती
  • बोगद्यातील दिव्यांची दुरुस्ती
  • बोगद्यातील आतील बाजूस रंगरंगोटी, रिफ्लेक्टर्स
  • लोखंडी कठडे बसविण्यात आले