नैर्ऋत्य मोसमी वारे (मान्सून) कधी एकदा कोकणात दाखल होतात याकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांची मोसमी पावसाने काहीशी निराशा केली आहे. दक्षिण कोकण व गोव्यात ४८ तासांत पावसाच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचा अंदाज ‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’ने (आयएमडी) गुरुवारी वर्तवला होता. मात्र शुक्रवारी वातावरणीय स्थिती बदलली असून आता कोकणात पावसासाठी अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कोकण किनारपट्टीत पूर्वमोसमी पावसाची मात्र शक्यता आहे. ‘आयएमडी’च्या पुण्याच्या हवामान केंद्र संचालक सुनीता देवी म्हणाल्या, ‘‘हवामानाच्या सुधारित अंदाजानुसार कोकणात पाऊस येण्यास थोडा वेळ लागेल. सध्या देशाच्या पश्चिम भागात पावसाच्या प्रगतीची शक्यता कमी आहे. आता दोन दिवसांनंतरच वातावरणीय स्थिती पाहूनच कोकणविषयी सांगता येईल. कोकण किनारपट्टी व गोव्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे.’’
‘आयएमडी’ने शुक्रवारी सायंकाळी दिलेल्या अंदाजानुसार पुढच्या ३ ते ४ दिवसांत मध्य व उत्तर बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांत पावसाच्या प्रगतीसाठी अनुकूल स्थिती आहे. सध्या मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, कर्नाटक किनारपट्टीसह त्याचा दक्षिण व उत्तरेकडील आतील भाग, आंध्र प्रदेशची दक्षिण किनारपट्टी, रायलसीमा आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागराचा आणखी भाग तसेच ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांत पाऊस पोहोचला आहे.