मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर विशेषत: घाटात पावसाळय़ातही निर्धोक प्रवास करता यावा यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन- एमएसआरडीसी) आवश्यक कामे वेगाने करण्यात येत आहेत. दरडी कोसळू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत असून, त्यासाठी  प्रथमच इटालियन आणि स्वीस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ जुलै २०१५ मध्ये जी दुर्घटना घडली तशी पुन्हा घडू नये, यासाठी महामंडळाने आयआयटी, पवईच्या सल्ल्यानुसार दरडप्रवण क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आखणी केली आहे. त्यानुसार, आडोशी बोगदा (मुंबईच्या दिशेने), अमृतांजन पूल (मुंबई व पुणे दिशने) आणि खंडाळा बोगदा येथे ठेकेदारामार्फत भूगर्भाशी संबंधित तपासणी आणि सर्वेक्षण करणे, कडेकपारीतील सैल झालेले दगड काढून त्या ठिकाणचे मजबुतीकरण करणे, डोंगरमाथ्यासह आवश्यक ठिकाणी चर काढणे, जाळय़ा बसवणे, डायगोनल टाय रोप बसविणे, शॉटक्रिंट करणे, आवश्यक ठिकाणी गॅबियन वॉल्स बांधणे आदी कामांसाठी ५२ कोटी १९ लाख ९८ हजार ४५१ रुपये खर्च करण्यात येत आहेत. या कामाचा आढावा घेण्यात आल्यानंतर  आयआयटी., पवईने प्रस्तावित केल्यानुसार आणखी दोन कामे प्रगतिपथावर असून ही कामे अनुक्रमे ५६.३८ आणि ८.६१ कोटी रुपयांची आहेत, अशी माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली.

आयआयटी, पवईची संकल्पना

दरडप्रवण क्षेत्रातील कामे करण्यासाठी जानेवारी, फेब्रुवारीमध्ये टप्प्याटप्प्याने द्रुतगती महामार्गावरील वाहतूक पंधरा-पंधरा मिनिटांसाठी बंद ठेवण्यात येत होती. दरडप्रवण क्षेत्रातील सैल झालेले दगड काढण्यात आले असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामात प्रथमच हाय टेन्साईल स्ट्रेन्थ वायरच्या जाळय़ा व रॉक बोल्टिंगच्या कामासाठी इटालियन व स्वीस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या कामात पवई येथील आयआयटी संस्थेच्या दरड तंत्रज्ञ विभागाचे प्रमुख टी. एन. सिंग हे मदत करत आहेत.