तिकीट तपासनिसांचा अभाव असल्याने फुकटय़ा प्रवाशांसाठी विशेष मोहिमा घेऊन रेल्वेला अशा प्रवाशांना पकडावे लागत आहे. या मोहिमेतही मोठय़ा प्रमाणावर फुकटे प्रवासी सापडत आहेत. या वर्षी रेल्वेने राबविलेल्या विशेष मोहिमेत जानेवारी ते जून २०१४ या सहा महिन्यांच्या कालावधीत पुणे मंडलात तब्बल ९४ हजार ३५४ प्रवाशांना पकडण्यात आले. मात्र, कारवाईच्या कचाटय़ातून सुटलेले असे अनेक प्रवासी दररोज प्रवास करीत असल्याची शक्यता असल्याने या फुकटय़ांची डोकेदुखी रेल्वेला महागात पडू शकते.
पुणे- लोणावळा या एकाच मार्गावरील लोकलसेवेचा विचार करायचा झाल्यास बारा डब्यांच्या या सर्व लोकल दिवसभर प्रवाशांनी खच्चून भरलेल्या असतात. मात्र, त्या प्रमाणात रेल्वेला उत्पन्न मिळत नसल्याचा आजवरचा अनुभव आहे. पूर्वी प्रत्येक लोकलमध्ये तिकीट तपासनिसाकडून तपासणी होत होती. त्यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या अत्यल्प होती. मागील काही वर्षांमध्ये पुणे विभागात इतर गाडय़ांची संख्या वाढली. त्या तुलनेत तिकीट तपासनीस न वाढल्याने लांब पल्ल्यांच्या गाडय़ांनाही कधीकधी तिकीट तपासनीस मिळत नाहीत. त्यामुळे लोणावळा लोकल दुर्लक्षित झाली. अनेक दिवस लोकलमध्ये तिकीट तपासनीस फिरकतही नाहीत. त्यामुळे या मार्गावर फुकटे प्रवासी वाढले आहेत.
तिकीट तपासनीस पुरेसे नसल्याने रेल्वेला विशेष मोहिमा घेऊन फुकटे पकडावे लागत आहेत. या मोहिमेत पकडल्या गेलेल्यांची संख्याही दरवर्षी वाढत चालली आहे.
रेल्वेने प्रवास करताना रेल्वेच्या अधिकृत केंद्रांवरूनच तिकिटांची खरेदी करावी. अवैध तिकिटावर प्रवास करताना पकडले गेल्यास हा प्रवास विनातिकीट ठरवून कारवाई केली जाईल. प्रवासी भाडय़ाबरोबरच २५० रुपयांच्या दंडाची आकारणी केली जाईल. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याने प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊन प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.
 
पाच कोटी पाच लाखांचा दंड
रेल्वेच्या पुणे मंडलामध्ये विभागीय व्यवस्थापक सुनीत शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व वाणिज्य व्यवस्थापक गौरव झा यांच्या नेतृत्वाखाली फुकटय़ा प्रवाशांच्या विरोधात ही मोहीम सुरू आहे. रेल्वेतील तिकीट तपासनीस व रेल्वे सुरक्षा दलाचे जवान यांचा त्यात संयुक्तपणे सहभाग आहे. मागील सहा महिन्यात ९४ हजार ३५४ प्रवाशांना या मोहिमेत पकडण्यात आले. त्यांच्याकडून पाच कोटी पाच लाख २० हजार २३७ रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली. मागील वर्षी याच कालावधीत ७८ हजार ७९१ प्रवाशांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून चार कोटी ३३ लाख १६ हजार ३९३ रुपये दंडाची वसुली करण्यात आली होती. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा फुकटय़ा प्रवाशांमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येते.