साहित्याच्या प्रसारामध्ये योगदान देत वाचनाची चळवळ वर्धिष्णू करणारी ग्रंथालये गुरुवारी (१५ ऑक्टोबर) साजरा होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनी बंदच राहणार आहेत. त्यामुळे दरवर्षी विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने वाचन प्रेरणा दिन साजरा करणाऱ्या ग्रंथालयांची दारे यंदा खुली नसल्याने वाचकांमध्ये नाराजी आहे.

करोना प्रादुर्भावामुळे गर्दी टाळण्याच्या उद्देशातून गेल्या सात महिन्यांपासून ग्रंथालये बंद ठेवण्यात आली आहेत. टाळेबंदीनंतर एक एक गोष्टी हळूहळू खुल्या होत असताना ग्रंथालये बंद ठेवण्याच्या आदेशामुळे वाचन चळवळीला खीळ बसली आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर हा दिवस गेल्या पाच वर्षांपासून राज्यभरात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमांवर करोना संकटामुळे ग्रंथालये बंद असल्याने गदा आली आहे.

दुर्मीळ ग्रंथांचे प्रदर्शन, ज्येष्ठ विचारवंतांचे व्याख्यान अशा विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे यापूर्वी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येत होता.

मात्र, यंदा हा दिन साजरा होत असताना ग्रंथालय बंद याची खंत वाटते, असे परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. बार-रेस्टॉरंटला परवानगी आणि ग्रंथालये बंद हे धोरण पटणारे नाही. सुज्ञपणे वागणारा वर्ग ग्रंथालयांमध्ये येतो आणि काळजीपूर्वक पुस्तके हाताळतो. ग्रंथालयांना बंदिस्त करून हा दिवस कसा साजरा करायचा, असा सवाल त्यांनी केला. परिषदेचे पदाधिकारी गुरुवारी ग्रंथपूजन करून वाचन प्रेरणा दिन साजरा करणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

ऑनलाइन वाचन कट्टा उपक्रम

पुणे मराठी ग्रंथालयातर्फे ऑनलाइन वाचन कट्टा उपक्रमाद्वारे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार आहे. ‘करोना कालावधीत आम्ही काय शिकलो,’ या विषयासंदर्भात सभासदांनी आपले अनुभव सांगावयाचे आहेत. ग्रंथालय बंद असले, तरी ऑनलाइन वाचन कट्टा उपक्रमाद्वारे वाचकांच्या संपर्कात राहून करोना संकटाच्या काळात त्यांना आधार दिला जात आहे, असे ग्रंथालयाच्या कार्यवाह डॉ. अनुजा कुलकर्णी यांनी सांगितले. पुणे नगर वाचन मंदिरातर्फे ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करून वाचन प्रेरणा दिन साजरा केला जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे यांनी सांगितले.