शासकीय अध्यादेशात सुधारणा होणार असल्याने प्रस्तावच मागविले नाहीत

पुणे : वाचन संस्कृती समृद्ध करण्यासाठी कार्यरत असलेल्या ग्रंथालय चळवळीतील ग्रंथालय, ग्रंथालयीन कार्यकर्ते आणि ग्रंथमित्र सेवक गेली दोन वर्षे सन्मानासाठी प्रतीक्षेमध्ये असल्याची बाब राष्ट्रीय ग्रंथपाल दिनी उघड झाली आहे. शासकीय अध्यादेशामध्ये सुधारणा करण्यासाठी २०१९-२० वर्षांसाठी प्रस्तावच मागविण्यात आले नाहीत. तर, या वर्षी करोना प्रादुर्भावामुळे सारे ठप्प झाले आहे.

वाचन संस्कृतीच्या विकासामध्ये शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान लाभावे, ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा तसेच वाचकांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशातून शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून सवरेत्कृष्ट ग्रंथालयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार दिला जातो. ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ अशा चार वर्गवारीतील शहरी आणि ग्रामीण विभागातील प्रत्येकी एक याप्रमाणे आठ ग्रंथालयांचा सन्मान केला जातो. ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांचा डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार आणि सेवकांचा ग्रंथमित्र पुरस्काराने गौरव केला जातो. त्यामध्ये राज्यस्तरावरील कार्यकर्ता आणि सेवक पुरस्कारासह सहा विभागातील प्रत्येकी एका कार्यकर्ता आणि सेवकाचा सन्मान करण्यात येतो. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातर्फे या पुरस्काराची प्रक्रिया राबविली जाते. २०१८-१९ या वर्षीपर्यंत हे पुरस्कार देण्यात आले आहेत. मात्र, या पुरस्काराची प्रक्रिया राबविण्यात येणाऱ्या शासकीय अध्यादेशात सुधारणा करावयाची असल्याने २०१९-२० या वर्षीच्या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात आले नाहीत. यंदाच्या वर्षी करोना प्रादुर्भावामुळे ही प्रक्रियाच सुरू झालेली नाही, असे पुणे विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक डी. ए. क्षीरसागर यांनी सांगितले.

ग्रंथपाल सन्मानापासून वंचित

’ करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार सार्वजनिक ग्रंथालये, शाळा आणि महाविद्यालयांची ग्रंथालये बंद असल्याने राष्ट्रीय ग्रंथपाल दिन बुधवारी टाळेबंदीमध्ये अडकून पडला. त्यामुळे वाचक आणि पुस्तके यांच्यातील दुवा म्हणून काम करणारे ग्रंथपाल सन्मानापासून वंचित राहिले. राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त शासनमान्य आणि शासन अनुदानित ग्रंथालयांसह राज्यातील खासगी ग्रंथालयांनी कार्यक्रम घेऊन ग्रंथपालांचा सन्मान करणे अपेक्षित असते. मात्र, करोनामुळे ग्रंथालये बंद असल्याने राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाचे कार्यक्रम होऊ शकले नाहीत, असे पुणे विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक डी. ए. क्षीरसागर यांनी सांगितले.

’ शासनाच्या आदेशानुसार पुणे मराठी ग्रंथालय ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ग्रंथालयामध्ये राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा झाला नाही, अशी माहिती ग्रंथालयाच्या कार्यवाह डॉ. अनुजा कुलकर्णी यांनी दिली. महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये ग्रंथपाल हे पद अस्तित्वात नाही. राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा केला जात नसला, तरी परिषदेच्या वर्धापन दिन समारंभात ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जातो, असे परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. पुणे नगर वाचन मंदिरातर्फे गुरुवारी (१३ ऑगस्ट) ग्रंथपाल सविता गोकुळे यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे यांनी सांगितले.