सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे पुन्हा विजयी

पुणे : पुणे जिल्ह्य़ातील शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघ अशा दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने यश संपादन केले, तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या पक्षांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला. सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे या विद्यमान खासदारांनी विजयश्री राखली आहे, तर पालकमंत्री गिरीश बापट आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रथमच संसदेमध्ये प्रवेश केला आहे.

गिरीश बापट यांचा दणदणीत विजय

भाजपचे उमेदवार आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा मोठय़ा मताधिक्याने पराभव केला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघासह सर्वच मतदारसंघातून झालेले मोठे मतदान हे बापट यांच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले. भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये झालेल्या सरळ लढतीमध्ये बापट यांनी अपेक्षेप्रमाणे सहजगत्या विजय संपादन केला.

मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून बापट यांनी घेतलेली मतांची आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राखली. सलग दोन लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजय मिळवित इतिहास घडविला. पुणे कॅन्टोन्मेंट, वडगांवशेरी आणि शिवाजीनगर या मतदारसंघातून मोठे मतदान होईल, अशी काँग्रेसची अपेक्षा फोल ठरली. मात्र या तीन मतदारसंघांसह पर्वती, कोथरूड आणि कसबा मतदारसंघातून बापट यांना मताधिक्य मिळाले. मतदानाची टक्केवारी कमी झाली अशी चर्चा झाल्याच्या पाश्र्वभूमीवर बापट यांना मिळालेले मताधिक्य लक्षणीय असेच आहे.

सुप्रिया सुळे सलग तिसऱ्यांदा विजयी

बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळविला. त्यांनी भाजपच्या कांचन कुल यांचा दीड लाखांहून अधिक मताधिक्याने पराभव केला. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा त्यांच्या मताधिक्यात मोठी वाढ झाली. २०१४ च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांनी सुळे यांना जोरदार टक्कर दिली होती. त्यावेळी कमळाचे चिन्ह मतपत्रिकेवर असते तर कदाचित सुळे यांचा पराभव झाला असता अशी चर्चा रंगली होती. ही त्रुटी दूर करताना भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी देत कमळाचे चिन्ह असेल याची खबरदारी घेतली. भाजपने सुरुवातीपासूनच ही जागा प्रतिष्ठेची केली होती. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बारामतीमध्ये सभा घेऊन ही जागा निवडून आणण्याचा निर्धार केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मतदारसंघाकडे विशेष लक्ष दिले होते. कुल यांच्याशी त्यांची लढत होती. टपाली मतदान वगळता सुळे यांना शेवटच्या फेरीअखेर एकूण ६ लाख ८३ हजार ७०५ मते मिळाली. कुल यांना ५ लाख २८ हजार ७११ मते मिळाली.

आढळराव यांना डॉ. कोल्हे यांनी रोखले

सलग चौथ्या विजयाने लोकसभेमध्ये प्रवेश करण्याचा शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा वारू राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिंगणात असलेल्या प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी रोखला. तीनदा खासदार असल्याने प्रस्थापितविरोधी लाटेचा फटका आढळराव यांना बसला. खेड येथील विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) रद्द झाले, चाकण येथील  विमानतळ पुरंदरला गेले आणि बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांना न्याय मिळवून देण्यात आलेले अपयश त्यांना भोवले. दूरचित्रवाणी मालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकांनी घराघरांत पोहोचलेल्या कोल्हे यांची राजकीयदृष्टय़ा पाटी कोरी होती. आजी-माजी शिवसैनिकांमध्ये झालेल्या या लढतीला जातीय उल्लेखाचे गालबोट लागले. त्यामुळे चौथ्या विजयासह केंद्रामध्ये मंत्रिपदी विराजमान होण्याची आढळराव यांची मनीषा अपुरी राहिली.

श्रीरंग बारणे यांच्याकडून पार्थ पवार पराभूत

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी दणदणीत विजय संपादन केला. अजित पवार यांनी संपूर्ण लक्ष या मतदारसंघावर केंद्रित केले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी व्यक्तिश: अनेकांना दूरध्वनीद्वारे पार्थला मदत करावी असे आवाहन करीत मतदारसंघात तळ ठोकला होता. मात्र, लादलेला उमेदवार नको अशी भूमिका घेत मतदारांनी बारणे यांच्या पारडय़ात मते दिली. िपपरी-चिंचवड महापालिकेमध्ये झालेले सत्तांतर आणि गेल्या निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवार असलेले भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्यासह महेश लांडगे आणि गौतम चाबुकस्वार या आमदारांचे सहकार्य या बळावर बारणे यांनी मोठय़ा मताधिक्याने विजय संपादन केला. ‘हा पार्थ यांचा नाही तर अजित पवार यांचा पराभव असून मतदारांनी लादलेला उमेदवार नाकारला’ ही विजयानंतरची बारणे यांची प्रतिक्रिया बोलकी आहे.