News Flash

लोकजागर : ..असंही घडायचं पूर्वी

गनी आणि मी तिथून थेट पालिकेत धडकलो. मी तेव्हा पालिकेतील घडामोडींचं वार्ताकन करायचो.

(संग्रहित छायाचित्र)

मुकुंद संगोराम mukund.sangoram@expressindia.com

गोष्ट असेल नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीची. पुण्यात त्यावेळी अ‍ॅड. ग. नी. जोगळेकर हे नाव सर्वपरिचित होतं. समाजात त्यांची ओळख ‘गनी’ अशीच होती. अतिशय हरहुन्नरी आणि उत्साही व्यक्तिमत्त्व. त्यांचं नगरसेवकपद जाऊनही बराच काळ लोटला होता तेव्हा. रा. स्व. संघाच्या मुशीत तयार झालेल्या गनींचे त्या काळातील महाराष्ट्राचे साहेब असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्याशी अतिशय घनिष्ट संबंध होते. त्याबद्दल त्यावेळच्या काँग्रेस पक्षात बरीच कुजबूजही चालायची. पण गनी आपल्याच तोऱ्यात असायचे. समाजात काय चाललंय, याबद्दल ते खूपच जागरूक असायचे. विचारात स्पष्टता आणि त्याला कृतीची जोड असं हे अगदी उठून दिसणारं व्यक्तिमत्त्व होतं.

तेव्हाचा सेनापती बापट रस्ता खूपच चिवळा होता. आतासारखा रूंद नव्हता. वृत्तपत्रात एरवी पहिल्या पानावर येणारी अपघाताची बातमी त्या दिवशी आतल्या पानांत कुठेतरी तळाशी दिसेल ना दिसेल, अशी आली होती. बातमी होती, सेनापती बापट रस्त्यावर पत्रकारनगरकडे (तेव्हा बारामती होस्टेल अशी त्या रस्त्याची ओळख व्हायची होती.) वळतानाच्या चौकात असलेल्या विहिरीची. आतासारखा तो रस्ता झगमगाटात नव्हता. त्यामुळे रात्रीच्या अंधारात एक सायकलस्वार त्या विहिरीत पडून जखमी झाल्याची ती बातमी. दुपारी कार्यालयात गनींचा फोन आला. म्हणाले, वेळ असेल तर एके ठिकाणी माझ्याबरोबर याल का? नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. गनी आपली छोटीशी मोटार घेऊ न आले आणि मला घेऊन थेट सेनापती बापट रस्त्यावर त्या विहिरीपाशी पोहोचले. विहिरीची पाहणी केली. तिच्या आसपास झुडपं वाढली होती आणि सहजी ती दिसेल, अशी शक्यताही नव्हती. हे सगळे भयंकरच. एखाद्या मोठय़ा अपघाताला थेट निमंत्रण देणारं.

गनी आणि मी तिथून थेट पालिकेत धडकलो. मी तेव्हा पालिकेतील घडामोडींचं वार्ताकन करायचो. आम्ही दोघं थेट शहर अभियंत्याच्या खोलीत. तेव्हा कुणालाही तिथं सहज प्रवेशही मिळे. गनींनी त्या विहिरीची कथा सांगितली आणि त्यावर जाळी घालायलाच हवी, असा आग्रह धरला. शहर अभियंत्यांनी रस्ता विभागाच्या प्रमुखांना बोलावून घेतलं आणि हे प्रकरण बघायला सांगितलं. ते करतो म्हणाले. त्यानंतर गनी म्हणाले, आता रोज त्या रस्ता विभागप्रमुखांना भेटून काय झालं, ते पाहायची जबाबदारी तुमची. मी रोजच पालिकेत जात असे, त्यामुळे हे काम अवघड नव्हतं.

रोज रात्री गनी फोन करून काय झालं, ते विचारायचे. मीही काय झालं ते सांगायचो. परत आठ दिवसांनी गनींच्याच मोटारीतून त्या विहिरीपाशी गेलो, तर काहीच झालेलं नव्हतं. मग आमची वरात पुन्हा पालिकेत. आपल्याच मोटारीतून त्या ठिकाणी चलण्याचा आग्रह त्या रस्ताप्रमुखांना डावलता आला नाही. पुन्हा आम्ही तिघे त्या विहिरीपाशी. पालिकेच्या त्या अधिकाऱ्याने ते चित्र डोळ्याने पाहिलं. तोही चक्रावून गेला. लगेचच्या लगेच करतो म्हणाला.

काही दिवसांत त्या विहिरीवर पालिकेनं जाळी घातली व पुढचे अपघात टळले. सध्या ती विहीर जागेवर नाही. म्हणजे एकतर बुजवली तरी वा त्यावर इमारत तरी उभी राहिली. गनींनी प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करून घेतली. आपण काही फार मोठं केलंय, असा जरासाही भाव त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. काम झाल्याचं समाधान मात्र होतं. त्यानंतर त्या रस्त्यावरून जाणाऱ्या कोणत्याही वाहनचालकाला जीव ग. नी. जोगळेकरांमुळे वाचला, याचं भान असण्याची शक्यता नव्हतीच. ‘हे काम अमुक तमुक नगरसेवकाच्या निधीतून करण्यात आले आहे’, असे  फलक जागोजागी लावण्याची पद्धत त्या काळी नव्हती. आणि असती तरी त्या फलकावर गनींचं नाव थोडंच झळकलं असतं?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 3:45 am

Web Title: lokjagar road in pune city pune municipal corporation zws 70
Next Stories
1 राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर डॉ. कोल्हे उद्या पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर
2 पर्यटनस्थळी भटकंती करताना अतिउत्साह नको
3 शहरबात पिंपरी : शासकीय यंत्रणेच्या नियोजनशून्य कारभारामुळे जनजीवन विस्कळीत
Just Now!
X