डॉ. अरुण गद्रे (वैद्यकीय तज्ज्ञ आणि लेखक)

आमच्या घरची आíथक परिस्थिती जरी बेताची असली, तरीही सर्वात जास्त खर्च हा पुस्तकांवर होत असे. माझी आई (विद्या) आणि वडील (प्रभाकर) यांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यामुळे घरामध्ये पुस्तके मोठय़ा प्रमाणात होती. ‘चांदोबा’, ‘वेताळ’ आणि नंतरच्या काळात ‘फास्टर फेणे’ असा लहानपणीचा वाचनप्रवास. प्राथमिक शिक्षणानंतर इयत्ता आठवीमध्ये आम्ही मुंबईला गेलो. तेथे शाळेमध्ये राणे सर होते. त्यांनी माझ्यातील गुण ओळखून मला पुस्तके वाचण्यास प्रवृत्त केले आणि विविध विषयांची पुस्तके सुचविली. तो माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा होता. खरं तर माझ्यामध्ये वाचनाविषयी आत्मभान येण्याचा काळ म्हणावा लागेल. दादर येथील सार्वजनिक वाचनालयात मी नेहमी जात असे. वाचनाची आवड पाहून मला वाचनालयातून एकावेळी दोन पुस्तके मिळत होती. त्यामुळे ‘हैदी’, ‘पाडस’, ‘मोठय़ा रानातलं छोट घर’ अशी वयाप्रमाणे वाचताना वेगवेगळा अर्थ देणारी पुस्तके मी वाचायला सुरुवात केली. त्याचवेळी जयवंत दळवी यांच्या साहित्याचे वाचन केले. ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’, ‘इन्कलाब’, ‘सिंहासन’ अशा कादंबऱ्यांबरोबरच पु. ल. देशपांडे यांचे ‘गणगोत’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, इरावती कर्वे यांचे ‘युगांत’, रणजित देसाई यांचे ‘स्वामी’, शिवाजी सावंत यांचे ‘मृत्युंजय’, गो. नी. दांडेकर यांचे ‘माचीवरला बुधा’, प्रभाकर पेंढाकर यांचे ‘रारंगढांग’ हे माझ्या वाचनप्रवासातील आवडते साहित्य. याशिवाय नरहर कुरुंदकर, कुसुमाग्रज, बाबा आमटे, नामदेव ढसाळ यांची पुस्तकेही टप्याटप्याने वाचत होतो. महाविद्यालयीन जीवनानंतर ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये असताना इंग्रजी भाषा आणि साहित्याशी जवळून परिचय झाला. त्यावेळी वाचनासाठी फारसा वेळ नव्हता, पण लेखनाला काही प्रमाणात सुरुवात झाली होती. ‘घातचक्र’ ही कादंबरी मी याच काळात लिहिली.

वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लासलगाव येथे मी वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. साधारणत: १९९० ते २००६ या काळात वैद्यकीय व्यवसायासोबत वाचनाला खूप वेळ मिळत असे. त्यामुळे इंग्रजी वाचन या काळात खूप केले. बाबा आमटे यांचे मित्र असलेल्या डॉ. पॉल ब्रँड यांच्या ‘फिअरफुली अँड वंडरफुली मेड’ या पुस्तकाने मला झपाटून टाकले. त्यावेळी माझी वैद्यकीय क्षेत्राबद्दलची नजर बदलली. त्यांचे कुष्ठरोग्यांविषयी असलेले काम व आस्था पाहून मी भारावून गेलो. त्या प्रेरणेने माझ्या लेखणीतून ‘एक होता फेंगाडय़ा’ आणि ‘भावपेशी’ ही पुस्तके अवतरली. आमच्या भागामध्ये त्याकाळी इंटरनेटचा वापर करणारा मी एकमेव व्यक्ती असेन. गुगल, यू-टय़ूब या माध्यमांमुळे मोठय़ा प्रमाणात माहिती मिळत असून प्रगल्भता निर्माण होते, हा अनुभव मी घेतला. डॉ.मायकेल बेहे यांचे ‘द एज्ड ऑफ इव्हॉल्यूशन’, डॉ.पॉल डेव्हिस यांचे ‘द फिफ्थ मिरॅकल’ या पुस्तकांचे वाचन मला भारावणारे होते. ‘अ क्वेअर िथग हॅपन टू अमेरिका’ या मायकेल ब्राऊन यांच्या पुस्तकाने माझ्या विचारांना वेगळी दिशा दिली. ‘कैद केलेले कळप’ या पुस्तकाचे मी लेखन केले. उत्तम साहित्याचे वाचन हे लेखनासाठी प्रेरित करते, असे मला वाटते. मराठी आणि इंग्रजी साहित्यासोबतच हिंदीमध्ये प्रेमचंद यांचे साहित्य मी वाचले आहे.

पत्नी ज्योती हिने मला वाचनप्रवासात साथ दिली. तिलाही वाचनाची आवड असल्याने आमच्या घरामध्ये पुस्तकांचा मोठा संग्रह झाला. प्रत्येक पुस्तकाच्या वाचनातून स्वत:चे काय प्रशिक्षण होते, आपण कशा प्रकारे बोलू शकतो, ही शिकवण मला मिळाली. डॉ. पॉल फार्मर यांचे ‘पॅथॉलॉजी ऑफ पॉवर’ या पुस्तकाने मला आरोग्य धोरण आणि सामाजिक आरोग्याविषयीचे ज्ञान मिळाले. तर, ‘सूडाकडून करुणेकडे’ या वेगळ्या धाटणीच्या पुस्तकाचे लेखन करताना अनेक अनुभव आले. माझ्या वाचनप्रवासात भरप्पा यांच्या संपूर्ण साहित्यासह बंगाली भाषेतील अनुवादित साहित्य मला वेगळा अनुभव देणारे होते. मुंबईमध्ये असताना पुस्तकाच्या दुकानांपेक्षा पदपथावरून मी पुस्तके विकत घेत गेलो. तेच पुण्यामध्येही करतो. हिंदीपेक्षा मराठी व इंग्रजी पुस्तकांचे वाचन माझ्याकडून मोठय़ा प्रमाणात झाले. त्यामध्ये मिलिंद बोकील यांचे साहित्य मला विशेष भावले. वाचकाच्या डोळ्यासमोर ते व्यक्तिमत्त्व उभे करण्याची पद्धत एक वाचक म्हणून मनाला स्पर्श करणारी आहे. सामाजिक अंगाने केलेला विचार आणि सद्यपरिस्थितीचे भान राखून केलेले लेखन यांमुळे मी त्यांच्या कथा, कादंबऱ्या वाचल्या आहेत. याशिवाय राजन खान, राजन गवस यांच्याशी ओळख झाली. थोडक्यात आणि नेमके लेखन करण्याची अच्युत गोडबोले यांची शैली मला आवडली. त्यामुळे माझ्या बुकशेल्फमध्ये या सर्व लेखकांचे साहित्य आहे. ‘हितगूज लेकीशी’, ‘वयात येताना’, ‘हितगूज तरुण-तरुणींशी’, ‘कैफियत’, ‘किनवटचे दिवस’, ‘तिची ओवी’, ‘वधस्तंभ’, ‘विषाणू’ अशा अनेक पुस्तकांचे लेखन करताना वेळोवेळी वाचलेल्या साहित्याचा मला खूप उपयोग झाला. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीची व्यग्रता वाढली आहे. मात्र, हातामध्ये मिळेल त्या माध्यमाचा उपयोग प्रत्येकजण माहिती मिळविण्याकरिता म्हणजेच वाचनासाठी करीत आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येकाने आपल्याजवळील वाचनाच्या खिडक्या उघडायला हव्यात. आता यापुढे मी किंडलच्या माध्यमातून सहजतेने वाचन करण्याकरिता प्रयत्न करणार आहे. त्याकरिता माझे डोळे शेवटपर्यंत शाबूत रहावेत, हीच इच्छा आहे.

शब्दांकन : वीरेंद्र विसाळ