राज्यभरातील आठ केंद्रांवर ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा होत आहे. या स्पर्धेची सुरुवात रविवारी पुणे विभागाच्या प्राथमिक फेरीपासून झाली. या फेरीसाठी प्रसन्नकुमार अकलुजकर, सुषमा जोग-सावरकर, अश्विनी परांजपे आणि प्रवीण तरडे या दिग्गजांनी परीक्षण केले. यावेळी या स्पर्धेचे टॅलेंट पार्टनर असलेल्या आयरिस प्रॉडक्शन्सचे विद्याधर पाथरे आणि प्रसिद्ध दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी या युवा रंगकर्मीची पारख करण्यासाठी उपस्थित होत्या. ‘अस्तित्व’ संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिके’साठी इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजक म्हणून ‘झी मराठी’ ची साथ मिळाली आहे. त्याचप्रमाणे केसरी ट्रॅव्हल्स, बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन ऑईल यांचाही स्पर्धेच्या आयोजनात मोठा वाटा आहे.
 पुणे शहराबरोबरच सोलापूर, इस्लामपूर, बारामती या ठिकाणांहून महाविद्यालये या स्पर्धेत सहभागी झाली होती. १२ महाविद्यालयांच्या संघानी या स्पर्धेत आपला आविष्कार सादर केला. सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांनीच लिहिलेल्या संहिता हे या स्पर्धेचे वैशिष्टय़ ठरले.  डोंबाऱ्याचा खेळ, गुन्हेगारांकडे पाहण्याची सामाजिक मानसिकता, जादूचे प्रयोग करणाऱ्यामागे दडलेला माणूस, दुभंग व्यक्तिमत्त्व यांसारख्या विषयांची मांडणी एकांकिकांमधून करण्यात आली. भारताची प्रतिज्ञा नेमकी लिहिली कुणी? या विषयावर प्रकाशझोत टाकणाऱ्या एकांकिकेसह आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी एका चाहत्याने केलेली गंमत अशा अगदी आसपास दिसणाऱ्या घटनांतील नाटय़ हेरून विद्यार्थ्यांनी त्याचे सादरीकरण केले.  व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथेतील ‘चिट्टी’ने स्पर्धेत धमाल उडवून दिली. सहभागी झालेल्या बारा संघांमधून पाच संघांची निवड ७ डिसेंबर रोजी भरत नाटय़मंदिर येथे होणाऱ्या विभागीय अंतिम फेरीसाठी करण्यात आली. महाराष्ट्रातील आठ केंद्रांवरून निवडलेल्या उत्कृष्ट आठ एकांकिकांमधून सवरेत्कृष्ट एकांकिका, म्हणजेच महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ निवडण्यात येणार आहे.

*छोटय़ा छोटय़ा गोष्टींमध्ये दडलेले नाटय़
*लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेच्या माध्यमातून पुणे विभागातील तरूणाईने समोर आणले.
*अनेक नवे प्रयोग विद्यार्थ्यांनी त्यांच्या
सादरीकरणात केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून त्यांची मेहनतही दिसून येत होती. फक्त एकांकिकेसाठी म्हणून काही नवे शिकण्याची जिगर या विद्यार्थ्यांमध्ये होती.
’ एकांकिकेत करायचे आहे म्हणून चक्क
डोंबाऱ्यांबरोबर फिरून त्यांचे खेळ शिकणारे किंवा जादूचे प्रयोग शिकणारे नाटय़वेडे या स्पर्धेच्या माध्यमातून समोर आले.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
How many candidates appeared in the last offline set exam The set will be held twice a year
शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेला किती उमेदवारांची उपस्थिती? सेट वर्षातून दोनवेळा होणार?
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!

१ स्पर्धेच्या ठिकाणी अभिनेते सुनील बर्वे यांनी हजेरी लावली आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहात भर पडली.
२ उत्साह, काही महिन्यांची तयारी, स्पर्धेचा ताण.. याचा गोड शेवट विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या संघांनी अनुभवला.
३ यावेळी सुषमा जोग सावरकर, प्रतिमा कुलकर्णी, विद्याधर पाथरे, सुनील बर्वे, अश्विनी परांजपे, प्रवीण तरडे, प्रसन्नकुमार अकलुजकर उपस्थित होते.

महाअंतिम फेरी मुंबईत
येत्या २० डिसेंबर रोजी मुंबई येथे महाअंतिम फेरी होणार आहे. या महाअंतिम फेरीचे प्रक्षेपण झी मराठीवरील ‘नक्षत्र’ या कार्यक्रमातही पाहता येणार आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची संपूर्ण माहिती आणि पुणे विभागाच्या प्राथमिक फेरीचा निकाल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सादरीकरणातील कल्पकतेतून त्यांनी खुलवल्या एकांकिका
लहान खोलीत सादरीकरण करताना आयत्या वेळी बरेच बदल करावे लागले. ‘ब्लॅकआऊट’च्या जागाही बदलाव्या लागल्या. या बदलांचे थोडेसे दडपण होते, तरीही प्रयोग चांगला झाला. आमच्या एकांकिकेचा विषयच आमचा ‘हीरो’ आहे. त्यामुळे हा विषयच अधिक खुलून यावा यासाठी आणखी प्रयत्न करणार आहोत.
– नितीश पाटणकर (गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, एकांकिका- ‘रुह हमारी’)

प्रत्येक नाटकाची ‘थीम’ ही नाटकाची जान असतेच पण त्याबरोबरच अभिनय आणि सादरीकरणातील लहान गोष्टींवर आम्हाला भर द्यायचा आहे. आम्ही आमच्या नाटकात गरीब वस्तीचा माहोल उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. ते चित्रण अधिक खरे वाटावे यासाठी मेहनत घेणार आहोत.
– अभिप्राय कामठे (मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स, एकांकिका- ‘फोटू’)

आमचे नाटक ‘जादू’ याच संकल्पनेवर आधारित असल्यामुळे नेपथ्यावर बरेसचे अवलंबून होते. त्यामुळे कमी जागेत काम करण्याचा अनुभव वेगळा होता.  जादू आणि जादूगाराचा अभिनय आमच्या एकांकिकेसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे जादू करण्याच्या सरावावर अधिक भर देणार आहोत.
– निनाद गोरे (स.प. महाविद्यालय, एकांकिका- ‘विल ऑफ द विशस’)

प्राथमिक फेरीत प्रकाशयोजना आणि विशेष नेपथ्य वापरायचे नाही हे कळल्यावर नेपथ्यातील बऱ्याच गोष्टी आम्हाला बाजूला काढाव्या लागल्या. पण ते न वापरताही सादरीकरणाचा अनुभव चांगला होता. – अपूर्वा भिलारे (आयएलएस लॉ कॉलेज, ‘चिट्टी’)

गुन्हेगारांना समाज कसा स्वीकारत नाही या वास्तवावर आम्हाला आमच्या एकांकिकेतून प्रेक्षकांना विचार करायला लावायचे होते. तो हेतू साध्य झाला .- पंकज नागपुरे (मॉडर्न कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स, ‘मोटिव्ह’)

आम्ही यापूर्वी नाटय़स्पर्धाचा अनुभव घेतला होता. पण कमी साधनांमध्ये काम करण्याचा अनुभव वेगळा वाटला. आमच्या एकांकिकेतील सचिन तेंडुलकरचा ‘डाय हार्ड फॅन’ असलेला ‘सुधीरकुमार गौतम’ उभा करणे आव्हानच होते. कमी गर्दी वापरून आम्हाला क्रिकेटच्या स्टेडियमचा अनुभव प्रेक्षकांना द्यायचा होता. आम्ही पूर्णत: नवीन संघ वापरून हे सादरीकरण केले.
– सम्राट धुमाळ (केईएस राजारामबापू इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी (इस्लामपूर), ‘बाऊंड्रीच्या पलीकडे’)

आमच्या एकांकिकेला खूप नेपथ्य लागते. हे नेपथ्य न वापरता आम्ही कुठेच सादरीकरण केले नव्हते. ‘लोकांकिका’त प्रथमच तसे सादरीकरण करायला मिळाले. हा अनुभव खूप चांगला होता. पुन्हा सहभागी व्हायला नक्की आवडेल.
– अमेय आचार्य (सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स, ‘चीनची भिंत’)

प्रत्येक एकांकिका स्पर्धेत स्पर्धकांनी वेगळे काहीतरी सादर करणे अपेक्षित असते. आम्ही मूकन्याटय़ सादर केले. आमची एकांकिका नवीन होतीच पण लेखकाला ती सुचतानाच मूकनाटय़ म्हणूनच सुचली. एकांकिकेनंतर आम्हाला परीक्षकांशी संवाद साधून सादरीकरणाविषयी ‘टिप्स’ घेण्याची संधी मिळाली. सर्व नाटय़स्पर्धाना अशी संधी मिळतेच असे नाही.
– स्वप्नील कानसे (महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट
ऑफ टेक्नोलॉजी, ‘अंतर- डिस्कनेक्ट’)

आमच्या संघातील बहुतेक सर्व जणींचा हा एकांकिकेचा पहिलाच अनुभव होता. नाटय़स्पर्धा कशा होतात हे माहीत नसल्यामुळे जराशी भीतीही वाटत होती. पण तरी आम्ही आत्मविश्वासाने प्रयोग केला. आमच्या एकांकिकेच्या गोष्टीचा शेवट काय हे आम्ही प्रेक्षकांवर सोडले आहे. ती आमच्या संहितेतील वेगळी गोष्ट होती.     
सोनम देशमुख (शारदाबाई पवार महिला महाविद्यालय (बारामती), ‘एका अंताची सुरुवात’)