मान्सूनने अवघा देश व्यापला

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मान्सून) बुधवारी उत्तर अरबी समुद्र, कच्छ आणि पश्चिम राजस्थानच्या उर्वरित भागात मार्गक्रमण झाले आणि मान्सूनने संपूर्ण देश व्यापल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले. गुरुवारपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रात मान्सूनची सक्रियता कमी होणार असून त्यामुळे या काळात पाऊसही कमी होणार आहे.

राज्यात बुधवारीही पाऊस कमीच पडला. ‘आयएमडी’च्या आकडेवारीनुसार मराठवाडय़ात औरंगाबाद आणि विदर्भात गोंदिया आणि अकोला सोडता कुठेही पाऊस झालेला नाही. ‘आयएमडी’च्या हवामान विभागाच्या संचालक सुनिता देवी म्हणाल्या,‘‘गुरुवारपासून मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरुपात पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडय़ात ‘आयसोलेटेड’ प्रकारचा- म्हणजे एक किंवा दोन ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भातही विखुरलेलाच पाऊस राहील. पुढील पाच दिवसांसाठी पाऊस कमी राहणार असून या कालावधीत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज नाही. त्यानंतरची स्थिती आताच सांगता येणार नाही, परंतु पुन्हा चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.’’