साडेतीन फूट उंचीचे फायबरमधील बैठे पुतळे.. एकाच्या हाती संतूर, तर दुसऱ्याच्या हाती भगवान श्रीकृष्णाची बासरी.. अभिजात संगीतामधील दिग्गज कलाकारांची माहिती देणारे हे पुतळे जणू प्रत्यक्ष आपल्याशी संवाद साधत आहेत असा होणारा भास.. या दोन्ही कलाकारांनी आपल्या खास शैलीमध्ये एकमेकांचा करून दिलेला परिचय.. ‘शिल्प जणू सामोरीचे आरसा बिलोरी.. आपुलीच प्रतिमा बोले आपुलीच बोली!’ही प्रचिती देणारी शिल्पे पाहून ‘शिव-हरी’ म्हणजेच ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा आणि ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया शुक्रवारी भारावून गेले.
सहकारनगर-शिवदर्शन येथील वसंतराव बागूल उद्यानामधील भारतरत्न भीमसेन जोशी कलादालनामध्ये ‘मॅड मॅिपग’ हा अनोखा प्रकल्प साकारण्यात आला आहे. उपमहापौर आबा बागूल यांची ही संकल्पना ‘गार्डियन’चे मनीष साबडे आणि संजय दाबके यांनी साकारली आहे. यामध्ये पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे पुतळे बसविण्यात आले आहेत. हे दोन्ही कलाकार देशातील महान कलाकारांची माहिती देत असताना ते प्रत्यक्ष संवाद साधत असल्याचा भास पाहणाऱ्यांना होतो. त्यांच्या डोळ्यांतील भाव, उच्चारानुसार उघडझाप होणारे ओठ, डोळ्यांच्या लवणाऱ्या पापण्या यातून शिव-हरी स्वत: आपल्याशी बोलत असल्याचा आभास होतो. या प्रकल्पाची या दोघांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
शहनाईसम्राट उस्ताद बिस्मिल्ला खाँ, सतारवादनातील गौरीशंकर पं. रविशंकर, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी या तीन ‘भारतरत्नां’सह तबलानवाज उस्ताद अहमदजान थिरकवाँ खाँ, पं. हरिप्रसाद चौरासिया आणि पं. शिवकुमार शर्मा या तीन ‘पद्मविभूषणां’वर आधारित अध्र्या तासाची ध्वनिचित्रफीत पाहताना शिव-हरी यांनी जुन्या स्मृतींची एक सुरेल मैफल अनुभवली. या दोघांनीही आपल्या शिल्पाची पाहणी केली आणि छायाचित्रकारांना या शिल्पासमवेत स्वत:ची प्रतिमा टिपण्याची संधी दिली. या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी केवळ उपस्थित राहणार नाही, तर आम्ही पुणेकरांना आमच्या कलेचा आनंदही देऊ, अशी ग्वाही शिव-हरी यांनी आबा बागूल यांना दिली.
कलेचा हा प्रकार पाहून मी थक्क झालो, अशी भावना पं. शिवकुमार शर्मा यांनी व्यक्त केली. शिल्पाच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधलाच आहे. त्यामुळे मी आता काहीच बोलणार नाही. संतूरवर रागवादन करताना एकच तान पुन्हा येणार नाही हा माझा प्रयत्न असतो. तर, भाषणामध्ये पुनरावृत्ती कशी करू, असा नर्मविनोदी शैलीत त्यांनी सवालही केला. पुण्यामध्ये नेहमीच काही वेगळे घडत असते. हा पुतळा नाही, तर समोर माणूस बसला आहे आणि ओठ हलवून बोलतोय हे सारेच अद्भुत आहे, अशी भावना पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी व्यक्त केली. शक्य असल्यास हा प्रकल्प देशभरातील विविध शहरांमधील रसिकांना दाखवावा, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली.
फायबरमध्ये ही शिल्पे करण्यात आली आहेत. या दोन्ही कलाकारांचा आवाज ध्वनिमुद्रित करून तो या शिल्पांच्या ओठांतून बाहेर पडणाऱ्या शब्दांशी मिळताजुळता करण्याचे कसब साधले आहे. हे करण्यासाठी केवळ चार महिन्यांचा कालावधी लागला असून त्यासाठी १५ लाख रुपये खर्च आला असल्याची माहिती आबा बागूल यांनी दिली.

पुणे कलाकारांचे तीर्थस्थान
पुणे हे कलाकारांचे तीर्थस्थान आहे. येथे रसिकांनाही संगीताची ‘लगन’ आहे. कलाकारांचा सन्मान केला जातो. त्यामुळे पुण्यात येण्यास आम्हाला नेहमीच आवडते, असे मी शिवजींच्याहीवतीने सांगतो, असे पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी सांगितले. हे शिल्प पाहिल्यावर ‘मैं दिखनेमें अच्छा नही हूँ लेकिन संजयजीने मुझे बेहतर बनाया है’, अशी टिप्पणीही त्यांनी केली.