18 February 2020

News Flash

शहरबात पिंपरी : भाजपच्या बालेकिल्ल्यात धुसफूस

महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपावरूनच नव्या-जुन्यांचा वाद टोकाला गेला होता

चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर िपपरीचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी  शहर भाजपच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले.

बाळासाहेब जवळकर balasaheb.javalkar@expressindia.com

चंद्रकांत पाटील यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शहराचे कारभारी आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या विरोधातील भाजप कार्यकर्त्यांनी उचल खाल्ली आहे. एकीकडे अजित पवार यांनी तीनही विधानसभा मतदारसंघजिंकण्याच्या हेतूने शहराच्या राजकारणात पुन्हा लक्ष घातले असताना भाजपमध्ये मात्र मोक्याच्या क्षणी धुसफूस जाणवते आहे.

पिंपरी महापालिका निवडणुकीच्या काळात शहर भाजपमध्ये झालेला नव्या-जुन्यांचा वाद विधानसभेच्या तोंडावर पुन्हा तोंड वर काढू पाहत आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची निवड झाल्यानंतर या वादाला फोडणी देण्याचा प्रयत्न पक्षातील काही अतृप्त आत्मे करत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपमुळे शिवसेना उमेदवारांना मताधिक्य मिळाले असताना आणि विधानसभेसाठी भाजपला चांगले वातावरण असताना त्यात खडा टाकण्याचा काहींजणांचा उद्योग स्पष्टपणे दिसून येतो.

पाच वर्षांपूर्वी भाजपची शहरातील अवस्था दयनीय होती. स्वत:ला निष्ठावंत म्हणवून घेणारे सगळे नेते भाजपमध्येच असताना जेमतेम तीन नगरसेवक निवडून आले होते. सुमार कामगिरी असणाऱ्या या नेत्यांना जनाधार नव्हता, त्यांचे आपापसात बिलकूल जमत नव्हते. एकमेकांना मातीत घालण्याच्या प्रयत्नात त्यांनी पक्ष खडय़ात घातला होता. तत्कालीन शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचा अपवाद वगळता एकाही नेत्याला निवडून येता आले नाही. दुसऱ्याला निवडून आणणे तर विषय वेगळाच होता. लांडगे यांच्या निधनानंतर पक्षाचा बुरूज ढासळला. त्यानंतर, अंतर्गत लाथाळ्यांमुळे पक्षाची पुनर्बाधणी झालीच नाही. २०१४ च्या मोदी लाटेनंतरच्या काळात आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून एकापाठोपाठ भाजपमध्ये आले. त्यांच्या समर्थकांची भाजपमध्ये रांग लागली. जगताप, लांडगे आमदारद्वयांचा करिश्मा म्हणूनच महापालिका निवडणुकीत भाजपचे तीनचे संख्याबळ ७७ पर्यंत गेले. पक्षाची आणि महापालिकेची सूत्रे आमदारांच्या हातात एकवटली असताना त्यांच्या कार्यपद्धतीमुळे बरेचजण दुखावले. अनेकांनी खतपाणी घातल्याने हा वाद बऱ्यापैकी चिघळला होता. महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपावरूनच नव्या-जुन्यांचा वाद टोकाला गेला होता. त्या वादाचे भांडवल करून घेत काही ठराविक जणांनी स्वत:चा फायदा करून घेतला. इतरांची घोर निराशा झाली. भाजप पर्व सुरू झाले, तेव्हापासून जुन्या निष्ठावानांपैकी अमर साबळे खासदार झाले. एकनाथ पवार पक्षनेते आणि विलास मडिगेरी स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. सदाशिव खाडे यांना पिंपरी प्राधिकरणाचे अध्यक्षपद मिळाले. शैलजा मोरे उपमहापौर झाल्या. माउली थोरात यांना स्वीकृत नगरसेवकपद मिळाले. निवडून येऊ शकत नाही म्हणून उमेदवारी कापण्यात आलेल्या मोरेश्वर शेडगे यांना स्वीकृत नगरसेवकपदी बसवून पुनर्वसन करण्यात आले. त्यामुळे निष्ठावंतांना काहीच मिळाले नाही, ही ओरड चुकीची आहे. जे पदापासून वंचित आहेत किंवा ज्यांना लाभाचे पद हवे आहे, अशांचा आटापिटा सुरू असल्याचे दिसून येते. जे बाहेरून भाजपमध्ये आले, त्यांचेही चांगभले झाले आहे. अ‍ॅड. सचिन पटवर्धन (लोकलेखा समिती), नितीन काळजे, राहुल जाधव (महापौर), सीमा सावळे, ममता गायकवाड (स्थायी समिती अध्यक्षपद), बाबू नायर (स्वीकृत नगरसेवक), अमित गोरखे, हेमंत तापकीर, तेजस्विनी कदम (महामंडळ) यांना पदे मिळाली आहेत.

चिंचवडला लक्ष्मण जगताप आणि भोसरीत महेश लांडगे यांचा प्रभाव आहे, हे लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आले. जगताप यांनी त्यांच्या चिंचवड मतदारसंघातून जवळपास लाखाच्या घरात मताधिक्य दिले. तर, शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले असले तरी, त्यांना भोसरीत रोखण्याचे काम महेश लांडगे यांनी केले. आता निष्ठावंत म्हणवणाऱ्या गटाने आमदार जगताप आणि लांडगे यांनाच लक्ष्य केले असून त्यांच्याविरोधात कारवाया सुरू केल्या आहेत. भाजपमधील अस्वस्थतेकडे राष्ट्रवादीचे लक्ष आहे. अजित पवार यांना तीनही मतदारसंघ पुन्हाजिंकायचे आहेत. जगताप आणि लांडगे यांच्या विरोधात लढू शकतील असे ताकदीचे उमेदवार सध्या तरी राष्ट्रवादीकडे  दिसत नाहीत. त्यामुळे पूर्ववैभव प्राप्त करण्यासाठी पूर्वीचे नेते स्वगृही येत असतील तर राष्ट्रवादीला हवेच आहेत.

भोसरीत गुंडाराज

भोसरीत एकेकाळी मोठा दबदबा असलेले विलास लांडे विधानसभा निवडणूक लढतील की नाही, अशी शंका होती. मात्र, पाच वर्षांपासून भोसरीत गुंडाराज असल्याचा आरोप करत त्यांनी एक प्रकारे निवडणुकीसाठी शड्डू ठोकले आहेत. विलासराव पाच वर्षे  गुंडाराज का पाहत बसले, निवडणुकांच्या तोंडावरच भोसरीत दादागिरी वाढल्याचा  साक्षात्कार त्यांना का झाला, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. औद्योगिक पट्टय़ात हप्तेखोरी, व्यावसायिकांना दमदाटीचे प्रकार सुरू आहेत. सर्वसामान्य नागरिक दहशतीखाली आहे. जनतेची वेगवेगळ्या मार्गाने दिशाभूल होत आहे, असे भोसरीपुराण लांडे यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत सांगितले. राष्ट्रवादीने ज्यांना मोठे केले. चार-चार पदे दिली. तेच नेते पदे उपभोगून झाल्यानंतर दुसरीकडे गेले, हे राष्ट्रवादीचे दुखणेही त्यांनी मांडले. त्यांचा रोख आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यावर होता. पिंपरी महापालिकेत सत्ताधारी भाजपने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. त्याविरुद्ध आवाज उठवण्याची गरज असताना आपल्यातील (राष्ट्रवादी) काहीजण केवळ ठेके मिळवण्यासाठी भाजप नेत्यांशी हातमिळवणी करत आहेत. शहराचा कायापालट राष्ट्रवादीने केला. मात्र, आपण केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवू शकलो नाही. जनता आपल्यापासून दुरावली, याकडे त्यांनी अजित पवार यांचे लक्ष वेधले.

 

First Published on July 24, 2019 4:54 am

Web Title: maharashtra bjp chief chandrakant patil bjp workers in pimpri chinchwad zws 70
Next Stories
1 सेवाध्यास : आश्वासक ‘स्पर्श’
2 दस्त नोंदणीची कागदपत्रे आता घरबसल्या ‘अपलोड’
3 पुण्यातील जुना बाजार महिनाभर भरविता येणार नाही
Just Now!
X