राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात पोलीस कल्याण निधीकरता उभारण्यात आलेल्या पेट्रोल पंपाचं उद्घाटन करण्यात आलं. या पेट्रोल पंपातून मिळणार्‍या उत्पन्नातून पोलिसांसाठी विशेष मदत होणार आहे. अजित पवार यांनी यावेळी हा पंप सुसज्ज असून या आवारात लागणार्‍या विजेचा विचार करिता त्याचा आर्थिक बोजा तुमच्यावर पडू नये यासाठी पंपावर एखादा पॅनल उभारून त्यातून वीज निर्माण करा. यामुळे खर्च वाचण्यास मदत होईल असा सल्ला दिला. दरम्यान अजित पवारांनी यावेळी चायना पॅनल खरेदी न करता जर्मनी किंवा इतर देशांचा पॅनल घ्या अशी सूचनाही यावेळी त्यांनी केली.

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने कल्याण शाखामार्फत पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीणच्या आवारात उभारण्यात आलेल्या पाषाण रोड आणि बाणेर रोड या दोन पेट्रोल पंपांचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राजेश देशमुख, ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, “पोलिसांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या पेट्रोल डिझेल पंपाचे उद्घाटन आज झाले आहे. या पंपावरून नागरिकांना चांगल्या दर्जाचे इंधन मिळेल तसंच कोणत्याही प्रकारची भेसळ होणार नाही याची विशेष काळजी घ्या”.

“केंद्र सरकारच्या माध्यमांतून सतत होणार्‍या इंधन दरवाढीमुळे नागरिक सीएनजी आणि इलेक्ट्रिक बाइक, कार खरेदीकडे वळत आहेत. हे लक्षात घेऊन, आता सीएनजी स्टेशन वाढविण्याची गरज असून इलेक्ट्रिक बाइककरिता चार्जिंगसाठी स्टेशन उभे करावे लागणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रयत्न केले जाणार आहेत,” असं अजित पवार यावेळी म्हणाले.

खंडणी, लाचखोरीला बळी पडू नका
“पोलिसांनी सामाजिक जीवनात वावरताना कोणत्याही पद्धतीची चुकीची घटना घडणार नाही याबाबत विशेष काळजी घ्यावी. चुकीच्या कृत्यामुळे संपूर्ण पोलीस दलाची बदनामी होते. त्या पार्श्वभूमीवर खंडणी, लाचखोरी अशा अमिषाला बळी पडू नका,” असं आवाहन अजित पवार यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना केले.