पुणे पोलीस दलातील ३० उपनिरीक्षकांकडून महासंचालकांकडे गाऱ्हाणे

पुणे : सात वर्षांपूर्वी राज्य पोलीस दलात झालेल्या खातेअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पोलिसांना सेवाज्येष्ठतेनुसार टप्प्याटप्प्याने उपनिरीक्षक (फौजदार) करण्यात आले. गृहविभागाने दिलेल्या आदेशानुसार निवृत्तीच्या उंबरठय़ावर असताना पुणे पोलीस दलातील ६० पोलिसांना उपनिरीक्षक करण्यात आले. गणवेशावर ‘तारे’ लागल्याचा आनंद होत असताना ३० जणांची बदली नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, कोकण विभागात करण्यात आल्याने नाराजी पसरली आहे.

राज्यसेवा परीक्षा  तसेच खातेअंतर्गत परीक्षेद्वारे उपनिरीक्षकांची पोलीस दलात निवड  करण्यात येते. २०१३ मध्ये पोलीस दलात झालेल्या खातेअंतर्गत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पोलिसांना सेवाज्येष्ठतेनुसार टप्प्याटप्प्याने उपनिरीक्षक करण्यात आले. राज्य सेवा परीक्षेद्वारे निवड झालेला नवप्रविष्ट पोलीस  उपनिरीक्षक अनुभवाने तसा कमी असतो. पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलिसांना उपनिरीक्षक केल्यास त्याचा फायदा तपास तसेच गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यास होईल, या हेतूने गृहविभागाने खातेअंतर्गत परीक्षेद्वारे उपनिरीक्षकपदाच्या रिक्त जागांवर निवड केली. आठवडय़ापूर्वी पुणे, मुंबईसह राज्य पोलीस दलातील १ हजार ६१ पोलिसांना उपनिरीक्षक करण्यात आले.

उपनिरीक्षकपदी निवड झालेले बहुतांश पोलिसांचे वय ५० वर्षांपुढे आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी नियुक्तीस आहे. तेथेच उपनिरीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळेल, अशी आशा पोलिसांना होती. प्रत्यक्षात मात्र अनेक पोलिसांच्या बदल्या दुसऱ्याच जिल्ह्य़ात करण्यात आल्याने पोलीस दलात निराशेचे वातावरण पसरले आहे. पुण्यातील ६० पोलिसांना उपनिरीक्षक करण्यात आले. त्यापैकी ३० पोलिसांची नागपूर, अमरावती, नाशिक ग्रामीण, औरंगाबाद, कोकण विभागात बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांना विरोध करण्यात आला आहे. निवृत्तीच्या उंबरठय़ावर असताना उपनिरीक्षकपद मिळाले, याचा आनंद वाटत असताना अन्य जिल्ह्य़ात बदल्या करण्यात आल्याने ३० पोलिसांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन दिले.

पोलिसांच्या तक्रारी काय?

उपनिरीक्षकपदी नियुक्त झालेल्या पोलिसांचे वय ५० ते ५५ वर्ष दरम्यान आहे. या वयात उपनिरीक्षक झालो तसेच गणवेशावर ‘तारे’ (स्टार) लागले याचा आनंद वाटत असताना बदल्या अन्य जिल्ह्य़ात करण्यात आल्या. साधारणपणे ५० ते ५५ वर्ष या वयात कौटुंबिक तसेच आरोग्यविषयक समस्या असतात. मुला-मुलींचे भवितव्य, विवाहविषयक चर्चा सुरू असतात. ज्या ठिकाणी नियुक्तीस आहे तेथेच उपनिरीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली असती, तर उपनिरीक्षक झाल्याचा आनंद द्विगुणीत झाला असता, अशा तक्रारी अनेकांनी केल्या.