केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) आतापर्यंत राज्यातील सहा उमेदवारांनी देशातील पहिल्या दहा उमेदवारांमध्ये स्थान मिळवले आहे. सनदी अधिकारी भूषण गगराणी यांच्यापासून सुरू झालेल्या या प्रवासात आता योगेश कुंभेजकर याने मानाचा तुरा खोवला आहे.
यूपीएससीच्या परीक्षेत उत्तर भारतीयांचेच वर्चस्व असते, पहिल्या दहामध्ये उत्तर भारतातील उमेदवारच दिसतात; हा समज राज्यातील काही उमेदवारांनी मोडीत काढला. आतापर्यंत राज्यातील साधारण सहा उमेदवारांनी पहिल्या दहा क्रमांकात स्थान मिळवले आहे. सनदी अधिकारी भूषण गगराणी हे ९० च्या दशकात गुणवत्ता यादीत पहिल्या दहामध्ये झळकले होते. त्यानंतर मनीषा कुलकर्णी, श्रावण हर्डिकर, विशाल सोळंखी यांनी राष्ट्रीय यादीत पहिल्या दहा उमेदवारांमध्ये स्थान मिळवले. नजीकच्या काळात या परीक्षेतील यशाने राज्याचे नाव मोठे केले ते अमृतेश औरंगाबादकर आणि नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार राज्यात पहिल्या आलेल्या योगेश कुंभेजकर याने. परराज्यातून येऊन पुण्यातील संस्थांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थीही गुणवत्ता यादीत झळकले आहेत.