क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र (सीएबीएम)ने प्रशिक्षणासह अंधांच्या महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या निवडीचे शिबीर ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन येथे सुरु आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून ४० पूर्णपणे आणि काही अंशतः अंध खेळाडू यात सहभाग घेत आहेत. हे सर्व खेळाडू विभाग पातळीवरील सामने आणि राज्य पातळीवरील सामन्यांमध्ये त्यांच्या कामगिरीच्या आधारवर निवडण्यात आले आहेत.

८ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०१८ रोजी मुंबईत झालेल्या राज्य पातळीवरील सामन्यांमध्ये भाग घेतलेल्या १२० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यातून ४० उत्तम खेळाडू या शिबिरात निवडण्यात आले आहेत. यातून महाराष्ट्राच्या संघाची निवड WBCC (वर्ल्ड अंध क्रिकेट परिषद) आणि CABI (क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया) याच्या नियमांतर्गत होणार आहे. या शिबिरात भाग घेणाऱ्या ४० खेळाडूंपैकी १७ खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये करणार आहेत.

३१ ऑक्टोबरला या शिबिराचे उद्धाटन झाले. ‘क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र गेली अनेक वर्ष खेळाडूंसाठी फारच चांगले उपक्रम राबवीत आहे. सर्व खेळाडूना शुभेच्या देऊन पुणे डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे उदघाटक इम्तियाज दफेदार यांनी सांगितले. या शिबिराचा मूळ उद्देश खेळाडूंना त्यांच्या खेळासाठी योग्य दिशा आणि सूचना मिळणे तसेच एखाद्या खेळाडूकडून सांघिक लक्ष गाठण्यास आणि योग्य ध्येयपूर्तीकडे वाटचालीस सहकार्य करणे हा आहे.