अनधिकृत वीजवापर व मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या कृषिपंपाचा वापर होत असलेल्या भागात सातत्याने ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रकार होत असल्याचे लक्षात आल्यामुळे कृषिपंपासाठी होणारा अनधिकृत वीजपुरवठा रोखण्यासाठी महावितरण कंपनीकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत. अनधिकृत वीजवापर थांबल्याशिवाय त्या भागातील ट्रान्सफॉर्मर बदलून न देण्याचा व ७० टक्के वसुली असलेल्या भागातच जळालेला ट्रान्सफॉर्मर बदलण्यास प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कृषिपंपांना वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरबाबत विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांनी याबाबत सर्व विभागांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. राज्यभरातील कृषिपंपांना दोन लाख ३६ हजार ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येतो. ज्या भागामध्ये वसुलीचे प्रमाण कमी आहे किंवा वीज वितरण हानी जास्त आहे, त्याच भागामध्ये ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाण मोठे आहे. सुमारे एक लाखांपेक्षा अधिक ट्रान्सफॉर्मरच्या विभागात वितरण व वाणिज्यिक हानी मोठी आहे.
ट्रान्सफॉर्मर जळण्याचे मुख्य कारण अनधिकृत वीजवापर हेच असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे अजय मेहता यांच्याकडून त्याबाबत विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रामाणिक ग्राहकांना फटका बसू नये म्हणून अनधिकृत वीजवापर काढून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे संबंधितांवर वीज कायद्यानुसार वीज चोरीची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ट्रान्सफॉर्मर जळण्याच्या घटनांचे संनियंत्रण करणे व ट्रान्सफॉर्मर बदलण्याच्या कामात पारदर्शकता व सुसूत्रता आणण्यासाठी मुख्यालयाकडून विशेष यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे. ट्रान्सफॉर्मर ज्या भागात जळाला ते गाव, विभाग, उपविभागचे प्रमुख व ट्रान्सफॉर्मरची जबाबदारी असणाऱ्या लाईनमनचे नाव, आदी तपशील रोजच्या रोज मुख्यालयास पाठविण्याच्या सूचना आहेत. त्याचप्रमाणे प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मरमुळे त्रास होणार नाही, त्यांच्या पंपांना ठरल्यानुसार वीज मिळेल, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही मेहता यांनी दिल्या आहेत.
 ट्रान्सफॉर्मर बदलण्याबाबत मार्गदर्शक सूचना
* जळालेल्या ट्रान्सफॉर्मरवरील चालू वीजबिलांपैकी ७० टक्के वीजबिल भरणाऱ्यांना ट्रान्सफॉर्मर बदलून देण्यास प्राधान्य.
* ट्रान्सफॉर्मर बदलल्यापासून १५ दिवसांत पुन्हा ट्रान्सफॉर्मर जळाल्यास संबंधित शाखा कार्यालयाच्या कनिष्ठ अभियंत्यास जबाबदार धरण्यात येऊन त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई.
* ट्रान्सफॉर्मर तिसऱ्यांदा जळाल्यास तो न बदलता त्याबाबत मुख्य अभियंत्याकडे संबंधितांनी अहवाल पाठविणे. त्यानंतर त्या ट्रान्सफॉर्मरचे काय करायचे, याचा निर्णय मुख्य अभियंता पातळीवर होईल.
* ट्रान्सफॉर्मर बदलताना सर्व कृषिपंपधारकांनी पंपावर योग्य क्षमतेचे कपॅसिटर लावलेले आहेत का, याची खात्री करावी.