महाराष्ट्राला आणि पर्यावरणाला वाचवायला माळकरी आणि वारकरीच पुरेसे आहेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी केले आहे. आषाढी वारीनिमित्त त्यांनी आज (दि.१७) जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहूमध्ये येऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी वारकऱ्यांसोबत देहू गावात वृक्षारोपन केले, याप्रसंगी ते बोलत होते.

पालखीचे दर्शन घेतले त्यानंतर सयाजी शिंदे म्हणाले, “महाराष्ट्राला वारीची मोठी परंपरा आहे. सध्याच्या करोना संकटामुळे तिचे स्वरूप बदलले आहे. करोना आणि पर्यावरणामुळे मानवाचे नुकसान होत आहे. मात्र, तुकोबारायांनी आपल्याला ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ असा संदेश दिलाय तर ज्ञानोबा माउलींनी ‘वृक्ष लावा आणि जलाशय वाढवा’ असं सांगितलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आणि पर्यावरणाला वाचवायला माळकरी आणि वारकरीच पुरेसे आहेत. मी सगळ्यांना आवाहन करतो की झाडांसमोर नतमस्तक व्हा. त्यांना मिठी मारा त्यातच तुम्हाला विठ्ठ्लाचं दर्शन होईल.”

सालाबादप्रमाणे यंदाही आषाढी वारीला सुरुवात झाली. मात्र, यंदा वारीचे स्वरुप यंदा बदलले आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी (दि.१२) तर ज्ञानोबा माउलींच्या पालखीचे शनिवारी (दि.१३) रोजी प्रस्थान झाले. मात्र, यावर्षी करोना विषाणूचे संकट असल्याने पालख्यांची मिरवणूक काढून त्या मुख्य मंदिरात विसावल्या आहेत. दरम्यान, १ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने ३० जून रोजी या दोन्ही पालख्या पंढरपूरला रवाना होणार आहेत.